जाहिरात

PCMC Election: 'फडणवीसांना आधीच सावध केलं होतं!' अजित पवारांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य

PCMC Election 2026 :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता आमनेसामने उभे ठाकले आहेत.

PCMC Election: 'फडणवीसांना आधीच सावध केलं होतं!' अजित पवारांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य
PCMC Election 2026: अजित पवारांनी केलेल्या टीकेला रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
पिंपरी चिंचवड:

सुरज कसबे, प्रतिनिधी

PCMC Election 2026:  पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता आमनेसामने उभे ठाकले आहेत. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या सत्तेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, असे मी आधीच देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते, असा खळबळजनक खुलासा चव्हाणांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले चव्हाण?

पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना रविंद्र चव्हाण यांनी अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, हे लोक कशाप्रकारे आपल्या सोबत जोडले गेले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. मी तर देवेंद्र फडणवीस यांना नेहमी म्हणायचो की, यांना सोबत घेताना थोडा विचार करा. 

आज मला पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आमचे कार्यकर्ते विचारत आहेत की हे नक्की काय सुरू आहे. आज हे लोक वर तोंड करून बोलत आहेत कारण ते आपल्याला घाबरत आहेत. हिंदुत्वाचे नाव घ्यायला अंगात रग लागते आणि ती भाजपच्या कार्यकर्त्याशिवाय कोणातही नाही, अशा शब्दांत चव्हाणांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

( नक्की वाचा : महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर )

'पैलवानाच्या नादी लागायचं नसतं'

अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चव्हाण यांनी स्थानिक आमदार महेश लांडगे यांचा संदर्भ देत थेट इशारा दिला. कालच्या पत्रकार परिषदेत बरेच आरोप करण्यात आले, पण मी एकच सांगतो की पैलवानाच्या नादी लागायचे नसते. 

महेश लांडगे यांची पैलवानकी अजून सुरू आहे ना? हेच विचारायला मी आज येथे आलो आहे. त्यामुळे उगाच पैलवानाच्या नादी लागू नका, असे म्हणत त्यांनी अजित पवारांना चोख प्रत्युत्तर दिले.

'भाड्याने एजन्सी घेऊन प्रसिद्धीचे प्रयत्न'

अजित पवारांचे नाव न घेता चव्हाण यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. काही लोक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. काहींना तर स्क्रिप्ट लिहून दिली जाते, कोणता शर्ट घालायचा हे देखील आता एजन्सी ठरवतात. पैसा प्रचंड असल्याने शेकडो मुले कंपन्यांमध्ये बसवून मी किती लोकप्रिय आहे, हे दाखवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण आपण आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच, निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपलाच निवडा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात भाजपाची 'भाकरी' फिरली! 42 नगरसेवकांचे तिकीट कापले, पाहा कुणाचे नाव यादीतून गायब )

शहराध्यक्षांना सक्त ताकीद 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्षांना सूचना देताना चव्हाण म्हणाले की, शहराध्यक्षांचा पूर्णच्या पूर्ण पॅनेल निवडून आला पाहिजे. कुठेही 'सेटिंग' करायची नाही, यावर माझे बारीक लक्ष आहे. मी स्वतः पूर्ण लेखाजोखा करायला बसलो आहे.

भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि अजित पवारांचे उमेदवार नाना काटे एकाच प्रभागात लढत असून, तिथे दोन भाजप आणि दोन राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणण्याचे 'सेटिंग' असल्याची चर्चा आहे, त्या पार्श्वभूमीवर चव्हाणांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

अजित पवारांनी नक्की काय आरोप केले होते?

शुक्रवारी अजित पवारांनी महायुतीचा धर्म बाजूला सारून भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. 2017 मध्ये मोदी लाट आणि विठ्ठलाच्या मूर्तीमधील भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपामुळे आमची सत्ता गेली, पण भाजपच्या सत्ताकाळात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला. 

आशियातील श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी चिंचवडवर कर्जाचा डोंगर उभा केला असून रस्तेखोदाई, कचरा, पदपथ आणि अगदी कुत्र्यांच्या नसबंदीमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच शहरातील नेत्यांनी रस्ते वाटून घेतले असून टेंडरमध्ये 'रिंग' केली जात असल्याचेही ते म्हणाले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com