- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत आहे
- प्रचार संपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून दांडका हातात घेतला आहे
- प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे आणि भाजप उमेदवार कमलेश वाळके यांच्यात राजकीय संघर्ष
सूरज कसबे
महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपला. प्रचार सभांवर यामुळे बंदी असली तरी घरोघरी जावून उमेदवारांना प्रचार करण्यास मुभा आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस डोअर टू डोअर प्रचारावर उमेदवारांचा भर असणार आहे. राज्यातल्या सर्वच महापालिकांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. त्या पैकीच एक पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या ठिकाणी एक गोष्टी सर्वांचे लक्ष वेधक आहेत. इथं भाजज कार्यकर्त्यांनी प्रचार संपताच पक्षाच्या झेंडा खाली ठेवत हातात दांडका घेतला आहे. त्या मागचे कारण ही हैराण करणारे आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव निवडणूक लढत आहेत. अण्णा बनसोडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर भाजपने ही अण्णा बनसोडे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे इथं मोठी चुरस निर्माण झाली आहे. या प्रभागामध्ये दडपशाही होऊ नये अशी भाजपची मागणी आहे. या प्रभागात भीतीचं वातावरण असल्याचा भाजपचा दावा आहे. अशा स्थितीत निवडणूक भयमुक्त कशी होणार असा भाजपचा प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर हा प्रभाग अतिसंवेदनशील घोषित करावा अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रभागात सर्वांना सुरक्षित वाटावे यासाठी भाजपने एक नामी शक्कल लढवली आहे. प्रचार संपताच भाजप कार्यकर्त्यांनी दांडके हातात घेतले आहेत. त्याचबरोबर जर कोणी दडपशाही करणार असेल तर तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भले तरी देऊ काशेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी असं भाजपने ठरवलं आहे. आमचा हा मानस असल्याचं भाजपचे उमेदवार कमलेश वाळके यांनी सांगितलं आहे.
कमलेश वाळके हे भाजपकडून या प्रभागात मैदानात आहेत. त्यांनी हातात दांडके घेऊन नागरिकांना घाबरू नका असा आवाहन करायला सुरुवात केली आहे. या आधी देखील या प्रभागात प्रचाराला बंदी करण्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्याचबरोबर पिंपरी गावात देखील दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे एकूणच पिंपरी चिंचवड शहराची राजकीय वातावरण तापल्याचं बघायला मिळतं आहे. शिवाय भाजप कार्यकर्त्यांनी हातात दंडूका घेण्याची चर्चा ही शहरात चांगली रंगली आहे.