- राज ठाकरे यांनी मतदानादिवशी दुबार मतदान करणाऱ्यांना फोडून काढण्याचे आदेश दिले आहेत
- १५ जानेवारीच्या महापालिका निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर भगवा गार्ड तैनात ठेवले जाणार आहे
- भगवा गार्डमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे पदाधिकारी सहभागी असतील
सागर जोशी
सतर्क राहा, बेसावध राहू नका, आणि जर दुबार मतदार तिकडे आला तर सकाळी 7 वाजता त्याला फोडून काढा हे वक्तव्य होतं राज ठाकरे यांचे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांना हे आदेशच दिले आहेत. मतचोरी, दुबार मतदान, बोगस मतदान रोखण्यासाठी आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सज्ज झाली आहे. दोन्ही पक्षाकडून मतदानादिवशी अर्थात 15 जानेवारीला प्रत्येक मतदान केंद्राबाहेर 'भगवा गार्ड' तैनात करण्यात येणार आहे. अशा दोन हजार गार्ड्सची मतदानकेंद्रावरील गैरप्रकारावर करडी नजर असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंनीही प्रेझेंटेशन देत मतचोरीवरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चाही काढला होता. आता महापालिका निवडणुकीत दुबार मतदानावरुन ठाकरे बंधूंनी इशाराच दिला आहे. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी दुबार मतदान करताना कुणी आढळलं तर ठोकून काढण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना दिलेत.
बोगस मतदाना विरोधात ठाकरे आक्रमक झाले आहेत. सतर्क रहा, बेसावध राहू नका, दुबार मतदार आला की फोडून काढा असे थेट आदेशच राज यांनी मुंबई आणि ठाण्याच्या जाहीर सभेतून दिले. आता राज आणि उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर भागवा गार्डची निर्मिती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे हे भगवा गार्ड पथक कसं असेल त्यावर आपण एक नजर टाकूयात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं 'भगवा गार्ड' हे विषेश पथक तैनात केलं जाईल. प्रत्येक मतदान केंद्राजवळ आणि आसपासच्या परिसरात 'भगवा गार्ड' कार्यरत असतील.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेली दुबार मतदारांच्या नावाची यादी 'भगवा गार्ड'कडे देण्यात येईल. मुंबईत दुबार मतदारांना रोखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर हे गार्ड तैनात असतील. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बोरिवली देवीपाडा मैदानात भगवा गार्ड लॉन्च करण्यात आले. मनसेकडून या भगवा गार्ड्सना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. मतदान केंद्रावर दुबार किंवा बोगस मतदान करताना कुणी आढळला तर त्याला थेट प्रसाद दिला जाईल. दुबार मतदारांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळपासूनच सुरु होईल. दोन्ही पक्षांनी त्यासाठी भरारी पथकही तयार केल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे.
दुबार मतदान कराल तर याद राखा असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. दुबार मतदार दिसला की कळवा, तिथेच
त्याचा कार्यक्रम होईल असं ही ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, हा अराजकता माजवण्याचा प्रयत्न असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे. तसंच काही ठिकाणी निवडणूक यंत्रणेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीतीही साटम यांनी भगवा गार्डवरुन व्यक्त केली आहे. दुबार मतदान किंवा बोगस मतदान हा कायदेशीर गुन्हाच आहे. पण ते रोखण्याचं काम अर्थातच निवडणूक आयोगाचं आहे आणि ते त्यांनी नक्कीच करावं मात्र, ठाकरेंच्या भगवा गार्डवरुन मतदान प्रक्रियेत काही अडथळा यायला नको, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world