पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना महायुतीमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. नंदुरबारमधील सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ही ऑफर दिली आहे. काँग्रेसमध्ये विलीन होऊन मरण्यापेक्षा महायुतीत सामील होऊन अभिमानाने तुमची स्वप्ने पूर्ण करा, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याचा नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला. मोदींनी म्हटलं की, "बारामती मतदारसंघातील मतदानानंतर शरद पवार चिंतीत आहेत. छोट्या पक्षांच्या विलिनीकरणाबाबतचं त्यांचं वक्तव्य खूप विचार करुन त्यांनी केलं आहे. ते हताश आणि निराश आहेत. त्यांना वाटतंय की 4 जूननंतर सार्वजनिक, राजकीय जीवनात टीकून राहायचं असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. म्हणजेच नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं मन बनवलं आहे. मात्र काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा ताठ मानेने अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत या आणि अभिमानाने तुमची स्वप्ने पूर्ण करा", असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवारांचं प्रत्युत्तर
नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनीही रोखठोक प्रत्युत्तर दिलं. "नरेंद्र मोदीजींची अलीकडची वक्तव्ये आपण ऐकली तर ती वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारी आहे. तिथे मी आणि आमचे सहकारी असणार नाहीत. आतापर्यंत झालेल्या मतदानात मोदीजींच्या विचाराविरोधात जनमत तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहे. त्यांची अस्वस्थता त्यांच्या वक्तव्यातून दिसते किंवा संभ्रम निर्माण करणारी आहे", असं शरद पवार यांनी म्हटलं.
( नक्की वाचा- मोठा बातमी! अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर)
"माझे व्यक्तिगत संबंध वेगळे आणि विरोधातील भूमिका वेगळी आहे. संसदीय लोकशाही मोदींमुळे संकटात आली आहे. लोकशाहीवर ज्या विचारधारेचा विश्वास नाही. त्या लोकांसोबत जाणं व्यक्तिगत सोडा, राजकीय देखील माझ्याकडून शक्य होणार नाही", असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
( नक्की वाचा : ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरेंचा 'निष्ठावंत' की शिंदेंचा 'शिलेदार' )
पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदींचं वक्तव्य- नाना पटोले
"लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपला पराभव होत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच पराभवाच्या चिंतेतून नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर दिली आहे. शरद पवारांची एनसीपी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली म्हणून टीका करता व ठाकरेंबद्दल ममत्व दाखवता आणि शरद पवारांना जाहीर ऑफर देता म्हणजे नरेंद्र मोदी यांनीच पराभवावर शिक्कामोर्तब केले", अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.