आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन विकास आघाडीनं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोलामध्ये पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. CAA, NRC आणि समान नागरी कायदा या मुद्यावर आंबेडकर यांनी सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. भाजपा हिंदू मतदारांनाच फसवत असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे.
जाहिरनाम्यात काय?
समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही पण हा आरएसएसला धोका आहे. धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या भाजपा, RSS, बजरंग दल यांना या कायद्याचा धोका आहे, असा टोलाही आंबेडकर यांनी यावेळी लगावला.
कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल असेही जाहिरनाम्यात स्पष्ट करण्यात आल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
काँग्रेसचा जाहीरनामा आला... हुकमाचा एक्का टाकला, 'ही' आहेत 5 प्रमुख वैशिष्ट्य
केंद्रात शिक्षणावर फक्त 3 टक्के तरतूद आहे, राज्यात 5 टक्के तरतूद आहे. शिक्षण ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. म्हणून त्याला 9 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन, आंबेडकर यांनी दिलं आहे.
सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे, तिला आम्ही थांबवणार आहोत. नवीन औद्योगिक धोरण राबवणार आहोत, ज्यामुळे शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रती क्विंटल भाव किमान 9 हजार आणि सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव दिला जाईल. शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीने आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहोत, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली.