जाहिरात
Story ProgressBack

काँग्रेसचा जाहीरनामा आला... हुकमाचा एक्का टाकला, 'ही' आहेत 5 प्रमुख वैशिष्ट्य

Read Time: 3 min
काँग्रेसचा जाहीरनामा आला... हुकमाचा एक्का टाकला,  'ही'  आहेत 5  प्रमुख वैशिष्ट्य
नवी दिल्ली:

काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्याला न्यायपत्र असं नाव दिलं आहे. यातून 5 न्याय आणि 25 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. तरूण, महिला, शेतकरी, गरिब, मजूर यांना या जाहीरनाम्यात केंद्र स्थानी ठेवण्यात आलं आहे. जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे यूथ, ए म्हणजे अन्नदाता तर एन म्हणजे नारी अशा आशयाचा हा न्याय जाहिरनामा काँग्रेसनं प्रसिद्ध केला आहेत.


जाहीरनाम्यातील प्रमुख 5 वैशिष्ठ्य 


1) शेतीमालाला हमीभाव 
शेतकरी वर्गाला आकर्षीत करण्यासाठी काँग्रेसनं मोठं आश्वासन दिलं आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे. ही मागणी पुर्ण करण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे. स्वामीनाथनं आयोगानं सुचवल्यानुसार हा हमीभाव देण्यात येईल असं आश्वासन या जाहीरनाम्यात आहे. त्याच बरोबर कर्ज माफीसाठी विशेष योजना आखली जाणार आहे. पीक नुकसान झाल्यास 30 दिवसात नुकसान भरपाईचं आश्वासन देण्यात आलं आहे. नवीन आयात धोरण बनवलं जाईल. तर शेतमालावरील जीएसटीमध्ये ही सुट देण्यात येणार आहे. 

2) मजूरांसाठी विशेष कार्यक्रम 
काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात मजूरांचाही विचार केला आहे. मनरेगामध्ये काम करणाऱ्या मजूरांच्या मजूरीत काढ करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार रोजची मजूरी 400 रूपये करण्यात येणार आहे. त्याच बरोबर 25 लाखाचं हेल्थ कवर आणि मोफत उपचाराचं आश्वासन देण्यात आलं आहे. शहरी भागातही मनरेगासारखी योजना राबवली जाणार आहे. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी वीमा योजना आणण्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. शिवाय सरकारी कार्यालयात कॉन्ट्र्रॅक्ट पद्धत बंद करण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे. 

3) महिलांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण 
महिलांसाठी मोठी घोषणा काँग्रेसनं आपल्या न्यायपत्रात केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारमधील नव्या नोकऱ्यांत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. शिवाय गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला 1 लाख  रूपये देण्यात येतील. आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरघोस वाढ करू असं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. महिलांसाठी समान काम समान वेतन नियम लागू करणार असल्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे.   

4) तरूणांसाठी 30 लाख नोकऱ्या 
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागातल्या जवळपास 30 लाख नोकऱ्यांची भरती केली जाईल. 25 वर्षा पेक्षा कमी वयाच्या डिप्लोमाधारकाला नोकरी देण्याची गँरंटी काँग्रेसनं दिली आहे. युवकांना नवीन उद्योग काढायचे असतील, त्या स्टार्टअपसाठी 5 हजार कोटी देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे.  कोणत्याही सरकारी नोकऱ्यांच्या परिक्षेला घेतली जाणारी फी माफ करण्यात येईल. शिवाय ज्या तरूणांनी शैक्षणीक कर्ज घेतलं आहे अशाचं व्याजासह कर्ज माफ करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. 21 वर्षा पेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना दर महा 10 हजार रूपये शिष्यवृत्ती देण्याचं ही काँग्रेसनं ठरवलं आहे. 


5) आरक्षणाची मर्यादा वाढवणार 
आरक्षणाचा मुद्द सध्या सर्वत्र गाजत आहे. महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेशात आरक्षणाचा जोर वाढत आहे.  हे लक्षात घेता काँग्रेसनं हुकमाचा एक्का टाकला आहे. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात 50 टक्क्यां पेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल अशा विश्वास काँग्रेसला आहे. शिवाय खाजगी शिक्षण संस्थांमध्ये एससी,एसटी आणि ओबीसींना आरक्षण देण्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे. जातीवरून विद्यार्थ्यांची होणारी छळवणूक थांबावी यासाठी काँग्रेस नवा कायदा आणेल असं आश्वासन या जाहीरनाम्यात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination