जाहिरात
Story ProgressBack

मावळातून श्रीरंग बारणे हॅटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे मशाल पेटवणार?

मावळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग आप्पा बारणे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे पाटील यांचा थेट सामना होत आहे.

Read Time: 3 min
मावळातून श्रीरंग बारणे हॅटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे मशाल पेटवणार?

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, पुणे आणि रायगड या दोन  जिल्ह्यांमध्ये विभागलेला मावळ लोकसभा मतदारसंघ. 2009 साली निर्मित झालेल्या या मतदारसंघात यंदा चौथी लोकसभेची निवडणूक पार पडत आहे. निर्मितीपासूनच शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिलेलं आहे. 2009 ते  2019 सलग तीन वेळा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकलाय. 2009 ला दिवंगत गजानन बाबर यांनी या मतदारसंघाचे खासदार पद भूषवले. तर 2014 आणि 2019 सलग दोन वेळा विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या मतदारसंघाचा खासदार होण्याचा बहुमान मिळवला. यंदा श्रीरंग बारणे हे विजयाची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यंदाची निवडणूक देखील या मतदारसंघात तशी चुरचीशी होणार आहे. कारण राजकीय सत्ता संघर्षानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे गट थेट आमने-सामने आलेत. 

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग आप्पा बारणे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे पाटील यांचा थेट सामना होत आहे. दोघेही तगडे उमेदवार असल्याने कुणाचं पारडं जड असणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

(नक्की वाचा- नाराज नसीम खान यांना काँग्रेस हायकमांडकडून 'ही' ऑफर, खर्गे फोन करुन म्हणाले...)

मतदारसंघातील विधानसभांवर महायुतीचे वर्चस्व

मावळ लोकसभा मतदार संघात येत असलेल्या सहाही विधानसभांवर महायुतीचे वर्चस्व आहे. पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट), चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (भाजप), मावळमध्ये सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), उरणमध्ये महेश बालदी (अपक्ष भाजप संलग्न), कर्जतमध्ये महेंद्र थोरवे (शिवसेना शिंदे गट), पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर (भाजप) हे आमदार आहेत. 
  
सध्या तरी कागदावर श्रीरंग बारणे यांचं पारडं जड असल्याचं दिसतंय.  पण अंतर्गत गटबाजी, गावकी-भावकीच्या राजकारणात कोण बाजी मारतंय हे आगामी काळातच स्पष्ट होईल. गेल्या दोन निडणुका पाहता पाहुणे रावळ्यांनी श्रीरंग बारणे यांना दिल्ली वारी घडवली. 2019 च्या निवडणुकीत याचा फटका अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनाही बसला. 

बाहेरचा उमेदवार आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका या पाहुणे रावळ्यांनी घेतल्याने पार्थ पवारांना पराभव पत्करावा लागला आणि श्रीरंग बारणे यांनी दोन लाखांचं मताधिक्य मिळवत विजय प्राप्त केला. मात्र आता परिस्थिती बदलली आहे , की श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे इथलेच उमेदवार असल्यान त्यांनाही या गावकी भावकीचा फायदा होईल, असं बोललं जातंय. 

( नक्की वाचा : काँग्रेसला मुस्लीम मतं हवीत, उमेदवार नको ! माजी मंत्र्यांनी दिला घरचा आहेर )

मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या

मावळ लोकसभा मतदारसंघात 25 लाख 9 हजार 461 मतदार आहेत. त्यात 13 लाख 10 हजार 434 पुरुष मतदार, तर 11 लाख 98 हजार 868 महिला मतदार आहेत. यंदा  १५९ तृतीपंथी मतदार या मतदारसंघात आहेत. 

कोण आहेत श्रीरंग आप्पा बारणे?

श्रीरंग बारणे 2014 आणि 2019 सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत  अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा 2 लाख मतांनी पराभव करून श्रीरंग बारणे चर्चेत आले होते. 

कोण आहेत संजोग वाघेरे पाटील ?

संजोग वाघेरे पाटील एकेकाळी अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. यंदा  महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या निडणुकीला सामोरे जात आहेत.

पिंपरी चिंचवड महानगपालिकेची अनेक महत्वाची पदे वाघेरे यांनी भूषवली आहेत. यात नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापूर इत्यादी पदे त्यांच्या कडे होती. वाघेरे यांचा जनसंपर्क ही देखील त्यांची जमेजी बाजू आहे. तर मितभाषी स्वभाव नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर अशी त्यांची ओळख आहे. 

यंदा मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 33 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर थेट लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी होतीय. त्यामुळे मावळची जनता आपल्या मताच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटवते की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा दिल्ली वारी घडवते, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination