मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या 'वडील चोरले' टीकेचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवार यांच्यावरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. फोडाफोडीचं राजकारण राज्यात शरद पवारांनी सुरू केलं, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य होणार नाही. मात्र आज जे कुणी महाविकास आघाडीत बसले आहेत, त्यांनी जरा एकमेकांकडे बघा. तुम्ही काय उद्योग केले ते आठवा. उद्धव ठाकरे यांनी मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले होते. अरे मागितले असते तर तसेच दिले असते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - भाजप-NDAला 400 पार जागा जिंकून देण्याचा संकल्प जनतेने केलाय - PM मोदी)
राज्यात फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी केली
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात कुणी केली असेल तरी शरद पवारांनी केली. शरद पवारांनी 1978 साली पुलोद स्थापन केलं. त्यानंतर शरद पवारांनी पुन्हा 1991 ला छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडली. तेव्हा शिवसेनेचे आमदार फोडण्याचा काम शरद पवार यांनी केलं. छगन भुजबळांना ज्यांनी फोडलं ते आज इथे असतील. आपला बाहेरुन पाठिंबा आहे, मी काहीही बोलू शकतो, राज ठाकरे यांनी असं बोलताच सभास्थळी एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. नारायण राणे यांच्या साथीने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. तेव्हा आजचं नेतृत्व टाहो फोडताना दिसलं नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा: PM नरेंद्र मोदी निवृत्त होणार? अरविंद केजरीवालांनी असं वक्तव्य करुन काय साधलं?)
लाव रे तो व्हिडीओ
उद्धव ठाकरे यांच्या वडील चोरले या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंची एक व्हिडीओ क्लीप दाखवली. या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन टीका करताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, त्याच सुषमा अंधारे आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आहेत, आणि तुम्ही सांगता तुमचं तुमच्या वडिलांवर प्रेम आहे. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करायला लावलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकारमध्ये बसले होतात. कसलं राजकारण करता तुम्ही, अशी विचारणा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी केली.
(नक्की वाचा - अधिकृत विरुद्ध बंडखोर! जळगावमध्ये भाजप समोर बंडखोर भाजप उमेदवाराचेच आव्हान)
ठाण्याची वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय
राज ठाकरे यांनी भाषणातून परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा मांडला. ठाणे शहरात आज 7 ते 8 महापालिका आहेत. ठाण्यातील लोकसंख्या इथल्या लोकांमुळे वाढली नाही. देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येतात. मात्र या ठाणे शहरात बाहेरचे लोंढे थांबत नाही, तोपर्यंत काही घडू शकत नाही. खासदारांनी कितीही निधी आणला तरी काही होणार नाही. सगळं गणित लोकसंख्येचं आहे. ठाणे जिल्ह्यात बाहेरून येण्याचं प्रमाण अधिक आहे. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना इतकंच सांगेन, की खासदार म्हणून निवडून याल तेव्हा बाहेरच्या लोकांना थांबण्यासाठी काहीतरी आवाज उठवा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.