शरद सातपुते, प्रतिनिधी
Rohit Patil on Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. आता प्रचाराला मोजकेच दिवस असल्यानं त्याची तीव्रता वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (29 ऑक्टोबर 2024) रोजी सांगली जिल्ह्यातील तासगावमधील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'सिंचन घोटाळाप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला,' असा खळबळजनक आरोप अजित पवार यांनी तासगावच्या प्रचारसभेत केला होता.
तासगाव हा आर.आर. पाटील यांचा मतदारसंघ आहे. सध्या आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित आर. आर. पाटील तासगावचे आमदार असून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तासगावमध्ये संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित पाटील यांचं उत्तर
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर रोहित पाटील यांनी उत्तर दिलं आहे. गृहमंत्री,उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला,हे मला माहित आहे आणि योग्य वेळी त्याचं योग्य उत्तर देऊ, अशा शब्दात रोहित आर आर पाटलांनी अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
डील हयात असताना त्यांना मानसिक त्रास काय काय झाला,हे आबा त्यांच्या पुण्यातील मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे, हे मला आबांच्या मित्रांनी सांगितलंय आणि कोण त्रास द्यायचं याचं उत्तर आपण योग्य वेळी देऊ,असं रोहित पाटलांनी स्पष्ट केलंय, ते तासगावच्या ढवळी येथे प्रचार शुभारंभाच्या सभेमध्ये बोलत होते,अजित पवारांनी तासगाव मधून आर आर आबांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून रोहित पाटलांनी हा निशाणा साधला आहे.
( नक्की वाचा : अमित ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात काय? फडणवीसांनी केला गौप्यस्फोट )
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार यांनी म्हटलं होतं की, आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली, त्यावर आपली चौकशी करण्यासाठी आर आर पाटलांनी सही कशी केली, याचा उलगडा केला. आर आर पाटलांना आपण प्रत्येक वेळी आधार दिला, पण आबांनी आपल्याला कामाला लावले, अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
2014 साली सरकार बदललं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. देवेंद्र फडणवीस यांनी बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनी तुमची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं दाखवलं. त्यावेळी मला धक्का बसला, असंही अजित पवार म्हणाले.