जाहिरात

Sangli News : सांगलीत महायुतीमधील संघर्ष चिघळला, शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचं घर फोडलं?

Sangli Municipal Election 2026: सांगली - मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीसाठी  राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे.  महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून मोठा राडा झाला आहे.

Sangli News : सांगलीत महायुतीमधील संघर्ष चिघळला, शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचं घर फोडलं?
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी 

Sangli Municipal Election 2026: सांगली - मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीसाठी  राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे.  महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. उमेदवारांचे सुपुत्र संदीप व्हनमाने यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर वनखडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

सांगलीच्या मिरज प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजकीय वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे. या प्रभागात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. भाजपकडून सुनिता व्हनमाने या मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे सागर वनखंडे निवडणूक लढवत आहेत. बुधवारी रात्री (31 डिसेंबर 2025) याच वादातून सुनिता व्हनमाने यांच्या घरावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दगडफेक केली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून निवडणुकीला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे.

(नक्की वाचा : Pune News: पुण्यात भाजपाची 'भाकरी' फिरली! 42 नगरसेवकांचे तिकीट कापले, पाहा कुणाचे नाव यादीतून गायब )

वाहनांची तोडफोड आणि जीवे मारण्याचा प्रयत्न

या हल्ल्यादरम्यान केवळ घरालाच लक्ष्य करण्यात आले नाही, तर घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान केले. सुनिता व्हनमाने यांचे सुपुत्र संदीप व्हनमाने यांनी असा दावा केला आहे की, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशानेच हा सर्व प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संदीप व्हनमाने यांनी या संपूर्ण प्रकरणाचे खापर प्रतिस्पर्धी उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांवर फोडले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीच घरात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि वाहने फोडली, असा थेट आरोप भाजप उमेदवाराच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या टप्प्यात अशा प्रकारे हिंसाचार झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : मुंबईच्या सत्तेसाठी भाजपाची 'फिल्डिंग'; 137 उमेदवार रिंगणात, वाचा तुमचा उमेदवार कोण? )

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृतपणे पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलेली नसली तरी, भाजप उमेदवाराने पोलिसांना घटनेची पूर्ण कल्पना दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या राड्यानंतर मिरज प्रभाग क्रमांक 3 मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com