'कचा कचा' वक्तव्य भोवणार? अजित पवारांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार 

महायुतीच्या तीन नेत्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सत्ताधारी नेत्यांकडून आदर्श आचारसंहितेचं पालन केलं जात नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महायुतीच्या तीन नेत्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार मंगेश चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. 

यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून यामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या भाषणांचा उल्लेख करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 17 एप्रिल रोजी इंदापुरातील प्रचारासभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र तुम्ही मतदार करण्यासाठी गेले असताना मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवारासमोरील बटण कचा कचा दाबा म्हणजे मलादेखील निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आता यासंदर्भात शरद पवार गटाकडून वकील प्रांजल अग्रवाल यांच्याकडून  निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सत्ताधारी नेते  सरकारी निधीचा आणि पदाचा उपयोग स्वत:च्या स्वार्थासाठी करीत आहेत. आमच्या उमेदवाराला मत दिलं तरच निधी दिला जाईल असं जाहीर सभेत म्हणणं म्हणजे  लाच देण्याचा आणि भ्रष्टाचाराचा प्रकार आहे, असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्यासाठी अर्ज करण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे. 
 

Advertisement