जाहिरात

मुख्यमंत्र्यांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप- शिंदे सेना आमने-सामने

'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात', असं विधान शनिवारी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान केलं होतं.

मुख्यमंत्र्यांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप- शिंदे सेना आमने-सामने
उल्हासनगर:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात एका मुद्दावरून वाद पेटला आहे. उल्हासनगरमध्ये हे प्रकरण तापले असून शिवसेना शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहे. भाजपचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवाय या जिल्हाध्यक्षाला पदावरून हटवण्याची मागणी ही केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने सामने ठाकले असल्याचे चित्र दिसत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात', असं विधान शनिवारी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान केलं होतं. त्याचे पडसाद महायुतीच्या मेळाव्यात उमटले. या मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी रामचंदानी यांना शिवीगाळ करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मेळाव्यासाठी आलेले भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडेही शिवसैनिकांनी तक्रार केली. तसंच मेळाव्यावर बहिष्कार टाकत शिवसैनिक तिथून निघून गेले. 

ट्रेंडिंग बातमी - 'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात' भाजपचा नेता हे काय बोलला?

या प्रकारानंतर रवींद्र चव्हाण यांनी याच मेळाव्यात जाहीर दिलगिरी व्यक्त केली. झालेला प्रकार हा गैरसमजातून झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शिवसैनिकांचे त्यावर समाधान झाले नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी प्रदीप रामचंदानी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवाय त्यांना तातडीने पदावरून हटवावं अशी मागणी केली. येवढेच नाही तर त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवावं, अशी मागणी केलीये. त्यामुळे आता याबाबत भाजपा काय भूमिका घेते हे पहावं लागेल.

ट्रेंडिंग बातमी -  मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?

प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष आहेत. उल्हासनगरमध्ये भाजप बरोबर साई पक्ष ही आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामचंदानी यांनी भाषण करताना एकच खळबळ उडवून दिली होती. उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीचा दाखला देत असतानाच अचानक त्यांनी "आता कुणीही गद्दार राहिलेलं नाही, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे. असं वक्तव्य करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी मंचावर उपस्थित असलेले भाजपचे उमेदवार कुमार आयलानी हे गोंधळून गेले. काय करावे हेच त्यांना समजले नाही. त्यांच्या याच वक्तव्याचे आता पडसाद उमटत आहेत.