लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु होती. भाजपकडून नारायण राणे तर शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे येथून इच्छुक होते. मात्र अखेर नारायण राणे यांच्या रुपाने भाजपच्या पदरी ही जागा पडली आहे. यानंतर भाजप आणि नारायण राणे यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदय सामंत यांनी म्हटलं की, कित्येक दिवस रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेबाबत चर्चा सुरू होती. किरण सामंत यांनी काही दिवसांपूर्वी येथून माघार घेतली होती. मात्र किरण भैया हे एकच उमेदवार तिथे आहेत, हे मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं. उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता.
'उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार' निवडणुकीच्या तोंडावर भाजप केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ
नारायण राणेंना तिकीट जाहीर झालं आहे, त्यामुळे आम्ही त्यांना नक्की सहकार्य करू. फॉर्म भरताना उद्या आम्ही ताकदीने नारायण राणे यांच्यासोबत उपस्थित राहू. अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आम्ही मानतो. आता आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी राजकारणातून थांबलो नाही. किरण भैया यांना दिलेला शब्द नक्कीच पाळला जाईल, याची आठवणही उदय सामंत यांनी करुन दिली.
नारायण राणे यांना 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाईल. अमित शाह यांची 24 एप्रिलला रत्नागिरीत जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेला देखील मोठी गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करण्याचा महायुतीचा प्लॅन आहे. राणेंनाही या सभेनंतर मोठी ताकद मिळेल.
अजित पवारांनी केलं थेट शरद पवारांना लक्ष्य, कामाचा हिशेबच मांडला, वाद पेटणार?
शिवसेनेचा हक्काचा असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आता हातून निसटला आहे. आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई याठिकाणी काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.