वडिलांच्या अपयशाची लेकीकडून परतफेड, पक्षाचा बालेकिल्ला परत मिळवला

Solapur Lok Sabha Elections 2024 Result : तरुण आमदारांच्या लढतीमुळे सोलापूर मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

Advertisement
Read Time: 2 mins
सोलापूर:

Solapur Lok Sabha Elections 2024 Result : दोन तरुण आमदारांच्या लढतीमुळे चर्चेत असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या शेवटच्या अपडेटनुसार प्रणिती यांना 5,58,664 तर भाजपाच्या राम सातपुते यांना 4,75,538 मतं मिळाली. प्रणिती शिंदे यांनी 82639 मतांची विजयी आघाडी घेतली आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला अशी सोलापूरची एकेकाळी ओळख होती. प्रणिती यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे इथून खासदार होते. पण, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभवानंतरही काँग्रेसनं शिंदे घराण्यावर विश्वास ठेवत प्रणिती यांना तिकीट दिलं. प्रणिती यांनी तो विश्वास सार्थ ठरवत पक्षाचा बालेकिल्ला परत मिळवला.

( नक्की वाचा : बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी )
 

प्रणिती यांनी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला. राम सातपुते यांचा माळशिरस मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत नाही. त्यामुळे प्रणिती यांनी सुरुवातीलाच राम सातपुतेंवर बाहेरचे असल्याची टीका केली होती. 

Advertisement

सोलापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपचे एकहाती वर्चस्व होते. सहापैकी भाजपचे चार तर सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचा एकच आमदार होता. या सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवलाय. 

( नक्की वाचा : धाराशिवमध्ये ओमराजेंनी घडवला इतिहास, विक्रमी मताधिक्यासह पुन्हा खासदार )
 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मते आहेत. तर मुस्लीम समुदायाने मोठ्या प्रमाणावर मतदान करून काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. सोलापूर, पंढरपूर, मोहोळ विधानसभा मतदारसंघात  जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाची भूमिका मतदारसंघात निर्णायक ठरते. लोकसभा मतदारसंघातील ओबीसी मतदारांनी मात्र भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. मात्र या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. या बदललेल्या समीकरणाचा राम सातपुते यांना फटका बसलाय. 

Advertisement

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 59 टक्के मतदान झाले होते.मोहोळ आणि दक्षिण सोलापुरातील मतदानाचा वाढलेला टक्का कुणाला साथ देणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्यामध्ये अखेर प्रणिती शिंदे यांनी बाजी मारत या चर्चेला उत्तर दिलंय.