राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पाच टप्प्यात पार पडले. आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती निकालाची. मात्र याकाळात महायुती असो की महाविकास आघाडी आपल्या मित्र पक्षांनी निवडणुकीत काम केलं की नाही याची चाचपणी करत आहेत. त्याता आता मावळचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले नाही असा आरोप बारणे यांनी केला आहे. निकाला आधीच बारणेंनी केलेल्या या आरोपामुळे महायुतीत सर्वच काही अलेबल आहे असे नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्याता आता बारणे यांच्या या आरोपाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर मिळते हे पाहावे लागेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. अजित पवारांनी माझं काम केलं, माझं काम करण्याची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देखील दिल्या. परंतु काही नाराज कार्यकर्ते होते. त्यांनी शेवटपर्यंत माझं काम केलं नाही. या संदर्भात मी अजित पवारांकडे काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे देखील दिली आहेत. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी पदाधिकाऱ्यानी आमदारांनी महायुतीचा धर्म पाळत काम केलं. परंतु खालच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. असा थेट आरोप बारणे यांनी केला आहे.
हेही वाचा - EXCLUSIVE : 4 जूनला लोकसभेचा काय निकाल लागणार? प्रशांत किशोरांचं मोठं भाकीत
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. त्याचा परिणाम मतांवर होवू शकतो असेही बारणे यांनी सांगितले. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट देखील जप्त झाले असते असे मत बारणे यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी श्रीरंग बारणे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. याच सभेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दमही दिला होता. कोण काय करतं ते आपल्याला समजतं. त्यामुळे कोणी भ्रमात राहू नका असेही पवार यासभेत बोलले होते. श्रीरंग आप्पांचे प्रामाणिक पणे काम करा असे आवाहन त्यांनी याच सभेत कार्यकर्त्यांना केले होते. शिवाय आपल्या आणि संजोग वाघेरे यांच्या व्हायरल झालेल्या फोटबद्दलही त्यांनी समज गैरसमज याच सभेत बोलून दाखवले होते.
हेही वाचा - ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करा, भाजप आमदाराची मागणी
मावळ लोकसभेतून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होत आहे. बारणे यांना हॅट्रीक करण्याची संधी आहे. तर ठाकरे गटाला काही करून बारणे यांचा पराभव करायचा आहे. वाघेरे हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अजित पवारांचे खास म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी वाघेरे यांचे काम केल्याची चर्चा आहे. मावळ लोकसभेसाठी चौथ्या टप्प्याच 13 मे ला मतदान झाले होते. मावळ लोकसभेसाठी ५४ टक्के मतदान झाले होते.