राहूल वाघ, प्रतिनिधी
Nashik Municipal Corporation Election 2026 : सलीम कुत्ता प्रकरण पुन्हा एकदा नाशिकच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं असून या मुद्द्यावरून सुधाकर बडगुजर सध्या सर्वाधिक टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या निकाली निघाले असल्याचे स्पष्टीकरण बडगुजर यांनी वारंवार दिले असले. तरीही राजकीय पातळीवर हा विषय त्यांच्या पाठलाग सोडत नसल्याचे चित्र आहे.
सलीम कुत्ता हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात आरोपी म्हणून ओळखला जातो. त्याच्याशी संबंधित जुन्या प्रकरणावरून बडगुजर यांच्यावर आरोप–प्रत्यारोप केले जात असून हा मुद्दा आता केवळ व्यक्तीगत टीकेपुरता मर्यादित न राहता थेट भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहे.
भाजपत प्रवेश अन् राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली...
मुंबई व नाशिकमध्ये झालेल्या सभांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलीम कुत्ता प्रकरणाचा उल्लेख करत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. भाजपाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी संबंध असलेल्या नेत्यांना पाठबळ दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा राज्यस्तरीय राजकारणात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांना शिवसेना (ठाकरे गट) कडूनच उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी भाजपाने याच सलीम कुत्ता प्रकरणावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून आता तोच मुद्दा भाजपाला अडचणीत आणण्यासाठी वापरला जात आहे. मनसे, ठाकरे गट तसेच भाजपाचे काही मित्र पक्षही या प्रकरणाचा उल्लेख करत भाजपावर अप्रत्यक्ष दबाव टाकताना दिसत आहेत. बडगुजर यांना लक्ष्य करून प्रत्यक्षात भाजपावर राजकीय हल्ला करण्याची रणनीती विरोधकांनी आखल्याचे स्पष्ट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
