जाहिरात

Thane News: शिंदेंच्या ठाण्यात नरेश म्हस्केंना धक्का! तिकीट नाकारताच 'हट्टी मुलाच्या 'पोस्टनं वातावरण तापलं

Thane Municipal Election 2026 : ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आले आहे.

Thane News: शिंदेंच्या ठाण्यात नरेश म्हस्केंना धक्का! तिकीट नाकारताच 'हट्टी मुलाच्या 'पोस्टनं वातावरण तापलं

Thane Municipal Election 2026:  ठाण्यातील राजकीय वर्तुळात सध्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा असतानाच, आशुतोष यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली भावना आता चर्चेचा विषय ठरली आहे. घरातल्या हट्टी मुलांचं ऐकलं जातं आणि समंजस मुलाला माघार घ्यावी लागते, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी सूचकपणे बोलून दाखवली आहे.

आशुतोष म्हस्के हे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात सक्रिय झाले होते. विशेषतः आनंद नगर, गांधी नगर आणि आसपासच्या परिसरात त्यांनी मोठी जनसंपर्क मोहीम राबवली होती. खासदार नरेश म्हस्के यांचा वारसा आणि स्वतःचे काम यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता होती, मात्र ऐनवेळी त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले.

(नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )

कुटुंबातील हट्टी मुलाचा आणि समंजसपणाचा दाखला

आपल्याला तिकीट का मिळाले नाही, याचे स्पष्टीकरण देताना आशुतोष यांनी फेसबुकवर एक अतिशय भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कुटुंबात अनेकदा हट्टी मुलांचे म्हणणे लगेच ऐकले जाते, पण जो मुलगा समंजस असतो त्याला मात्र माघार घ्यावी लागते. 

माझ्या बाबतीतही कदाचित तसेच काहीसे झाले असेल. ही ओळ सध्या राजकीय वर्तुळात वेगळ्या अर्थाने चर्चिली जात आहे. पक्षातील काही विशिष्ट लोकांच्या दबावामुळे किंवा हट्टामुळे आपले तिकीट कापले गेले का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आशुतोष यांनी या पोस्टमध्ये स्वतःच्या योग्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की, कदाचित माझ्यात काहीतरी कमी असेल किंवा मी त्या योग्यतेचा नसेल. त्यांच्या या विधानामुळे त्यांचे समर्थक हळहळ व्यक्त करत असून, एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना प्रभागात उमटत आहे.

( नक्की वाचा : Thane Municipal Election ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण? )

 एकनाथ शिंदेंचा निर्णय आणि आशुतोष यांची भूमिका

ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि येथील प्रत्येक उमेदवारीवर त्यांचे बारीक लक्ष असते. आशुतोष म्हस्के यांना तिकीट नाकारण्याचा निर्णय खुद्द शिंदेंनीच घेतल्याचे समजते. यावर आशुतोष यांनी नम्रपणे आपली बाजू मांडली आहे. ते म्हणतात की, पक्ष स्तरावर काही अडचणी असू शकतात आणि शिंदे साहेबांचाही काहीतरी नाईलाज झाला असेल. त्यांचा कोणावरही राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, त्यांच्या शब्दांतील वेदना लपून राहिलेली नाही.

प्रभागातील लोकांसाठी भावूक आवाहन

आनंद नगर आणि गांधी नगर हा परिसर आशुतोष यांच्यासाठी केवळ प्रभाग नसून एक कुटुंब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडिलांच्या निवृत्तीनंतर या भागातील लोकांनी आपण त्यांचे प्रतिनिधित्व करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. तिकीट न मिळाल्यामुळे या नागरिकांची निराशा झाली असून, त्यांच्या सांत्वनासाठी आशुतोष यांनी हा पत्रप्रपंच केला आहे. संधी मिळाली नसली तरी माझा कणा ताठ आहे आणि मी लोकांसाठी सदैव उपलब्ध राहीन, असे वचन त्यांनी दिले आहे. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी दिलेली ही पोस्ट आता ठाण्याच्या राजकारणात कोणत्या नव्या वळणाला जन्म देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वाचा आशुतोष म्हस्के यांची फेसबुक पोस्ट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com