कल्याण पूर्व मतदार संघात तृतीय पंथीयांचा मतदानावर बहिष्कार, कारण काय?

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाला आलेल्या तृतीय पंथीयांचा अवमान केला गेला.

जाहिरात
Read Time: 3 mins
कल्याण:

अमजद खान 

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अशा वेळी अनेक ठिकाणी हणामारीच्या घटना घडल्याचे समोर आले आहेत. तर काही ठिकाणी मतदान यंत्र बंद झाल्याने मतदानात अडथळा आला आहे. पण कल्याण पूर्व मतादार संघातल्या तृतीय पंथीय मतदारांनी मतदानावरच बहिष्कार घातला आहे. या मागचे कारणही तसेच होते. त्यामुळे चिडलेल्या तृतीय पंथीयांनी मतदान केंद्रावर आल्यानंतरही तिथे मतदान केले नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पूर्वेतील राजीव गांधी शाळेतील मतदान केंद्रावर मतदानासाठी तृतीयपंथी गेले होते. त्यातील एका तृतीय पंथीयांचा होमगार्ड आणि पोलिस अधिकाऱ्याने अपमान केला. त्यामुळे तृतीय पंथीयांनी संताप व्यक्त केला. आम्हालाही दुसऱ्या लोकां प्रमाणे वागणूक मिळाली पाहीजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर तिथे आलेल्या तृतीय पंथीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येवूनही त्यांनी मतदान करण्याचे टाळले. झालेल्या अपमानाच्या निषेधार्थ त्यांनी त्याच ठिकाणी निषेध व्यक्त केला.

ट्रेंडिंग बातमी - वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...

 ठाणे जिल्ह्यात तृतीय पंथीय मतदारांची संख्या पाच हजार इतकी आहे. कल्याण पूर्व मतदार संघात 419 तृतीय पंथीय मतदार आहेत. कल्याण पूर्व मतदार संघात जाई बाई विद्यालयात 285  तृतीय पंथीय मतदारांचे मतदान आहे. काही तृतीय पंथी मतदारांचे मतदान अन्य मतदान केंद्रावर होते. आज दुपारी निता केणे तृतीय पंथीय राजीव गांधी शाळेतील मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहचला. त्यांना त्या ठिकाणच्या होमगार्डने रिक्षा घेऊन मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव केला. निता यांनी सांगितले की, त्यांना पाठिचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना चालण्यास त्रास होतो. होमगार्डने त्यांचे ऐकले नाही.

ट्रेंडिंग बातमी - "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी

होमगार्डने पोलिस अधिकाऱ्याला त्यानंतर बोलावून आणले.  पोलिस अधिकारी त्याठिकाणी आले. त्यांनी निता यांना मतदान करायचे असेल तर करा, अन्यथा निघून जा अशा शब्दात सुनावले. त्यामुळे तृतीय पंथीयांच्या भावना दुखावल्या. निता यांचा झालेला अपमान समस्त तृतीय पंथीयांचा अपमान आहे असं सर्वांचे म्हणणे होते. याठिकाणी तृतयी पंथीय सिमरन केणे यांनी सांगितले की, आमच्या एका तृतीय पंथीयासोबत गैरवर्तूणूक केली आहे. मतदान जनजागृतीच्या कार्यक्रमात आम्ही सहभाग घेतला होता. मतदान जनजागृती केली होती. 

ट्रेंडिंग बातमी  - रोहित पाटील- संजय काका एकाच वेळी समोरासमोर आले, पुढे काय झालं?

पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाला आलेल्या तृतीय पंथीयांचा अवमान केला गेला. लोकप्रतिनिधी गेल्या पंधरा दिवसात मतांचा जोगावा मागण्यासाठी आम्हाला हात जोडत होते. आत्ता ते देखील कुठे गेले. आमचे मत हवे आहे. पण आम्हाला सन्मान देणार नाही. सन्मान नसेल तर मतही देणार नाही. या भूमिकेवर आम्ही सर्व तृतीय पंधीय ठाम आहोत. त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला आहे असं त्यांनी सांगितलं. तृतीय पंथीयांनी बहिष्कार मागे घ्यावा. त्यांनी मतदान करावे असे आवाहन महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्यासह उद्धव सेनेचे पदाधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तृतीय पंथीय बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम होते.

Advertisement