- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईच्या राजकारणावर आणि शहरातील समस्यांवर आपली मतं मांडली
- ठाकरे बंधूंनी मुंबईकर नसलेल्या राज्यकर्त्यांवर शहराच्या गरजा न समजल्याची टीका केली आहे
- मुंबई महापालिका निवडणुका का लांबवल्या याबाबत राज ठाकरे यांनी प्रश्न निर्माण केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुलाखतीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यांनी या मुलाखतीत मुंबईबाबत भरभरून बोललं आहे. त्यांना तेवढेच टोकदार प्रश्न खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी विचारले. अगदी ड्रग्ज आणि त्यातून येणारा पैसा ते थेट राजकारणाशी असलेला संबंध यावरही ठाकरे बंधुंनी भाष्य केलं आहे. शिवाय मुंबईकर असल्या शिवाय मुंबई प्रश्न कुणाला समजणार नाहीत असं वक्तव्य करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधुंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नच या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण झाला आहे.
राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहीजे, सत्तेवर नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाल्यानंतर हात वर करायचे असा टोला उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत विरोधकांना लगावला आहे. दुर्दैवाने आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत. मराठी असले, महाराष्ट्रातील असले तरी मुंबईकरांसाठी किंवा या शहरातील नागरिकांसाठी काय हवय याची कल्पना त्यांना नाही. त्यांना मुंबईकरांबद्दल काही पडलेलं नाही. ते फक्त कंत्राटदारांसाठी काम करत आहेत असा टोला त्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे. साताऱ्या सापडलेल्या ड्रग्ज फॅक्टरीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्याचे ही उत्तर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत दिले आहे.
यावेळी राज ठाकरे ही बोलले. मुंबई महापालिकेची मुदत 2022 ला संपली होती. त्याच वेळी उद्धवचं सरकार गेलं. 2026 पर्यंत इतका काळ निवडणुका का घेतल्या नाहीत? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने केला. फडणवीस हे नागपूरचे आहे. अजून काही जण हे बाहेरचे आहेत. पण त्यातल्या किती जणांना मुंबई समजली आहे असं राज म्हणाले. मी स्वित्झर्लंड गेलो होतो. मला तिथे प्रश्न पडला की तिथला विरोधी पक्ष काय करत असेल? मुंबईला काय हवे हे मुंबईत जन्मल्याशिवाय कळणार नाही. बाहेरचे मंत्री मुंबईत येतात, तेव्हा त्यांना कळत नाही इथला नेमका प्रॉब्लेम काय आहे अशी खंत राज यांनी व्यक्त केली. कारण तो त्याच्या इथल्या गोष्टींशी मुंबईची तुलना करत असतो असं ही ते म्हणाले.
2010 पासून देशात मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे की जिने अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यास सुरूवात केली असं उद्धव या वेळी म्हणाले. महापालिकेत व्हर्च्युअल क्लासरुम सुरूवात करण्यात आली. ते शिकवणं मन की बात नव्हती, प्रश्नोत्तरं व्हायची. 2014-15 साली आम्ही दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ई-सिम द्वारे अभ्यासक्रम दिला. महापालिका शाळेत प्रवेश हवाय म्हणून आता लोकं चिठ्ठ्या घेऊन येतात आणि या शाळांबाहेर रांगा लागतात असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर राज ठाकरे यांनी वेगळी बाजू मांडली. आता शाळांपर्यंत ड्रग्ज पोचू लागलेत. राजकारणात वाढलेला पैसा आणि रस्त्यावर आलेले ड्र्ग्ज याचा काय संबंध आहे हे जोडून पाहीलं पाहीजे असं ते म्हणाले. राजकारणात निवडणुकांवर ज्या प्रमाणात खर्च होतोय आणि ज्या प्रमाणात रस्त्यावर ड्रग्ज येत आहेत ही विचार करणारी गोष्ट आहे असं ही ते म्हणाले.