उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा कोल्हापुरातल्या राधनगरी विधानसभा मतदार संघात घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय आपण मुख्यमंत्री असताना सरकार का पाडले गेले याचा गौप्यस्फोट यावेळी ठाकरेंनी केला. मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षाच्या काळात आपण महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर नेला होता. परदेशी गुंतवणूकही महाराष्ट्रात वाढली होती. उद्योग येत होते. ते दिल्लीतील मोदी- शाह जोडीला पाहवत नव्हतं. त्यामुळेच ठरवून आपलं सरकार पाडलं गेलं असे उद्धव ठाकरे यांनी या सभेत सांगितले. सरकार पाडण्यामागे मोदी-शाहचं होते असेही त्यांनी सांगितले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात किती कामे केली याचा पाढा उद्धव ठाकरे यांनी वाचला. सर्व सामान्यांसाठी दहा रुपयात शिवभोज थाळी सुरू केली होती. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची कर्ज माफी केली होती. गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकवर आणला. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत दिली. राज्याला पहिल्या क्रमांकावर नेलं होतं. त्यात माझं काय चुकलं. तरी ही माझं सरकार पाडलं गेलं. त्या मागची कारण काय होती हे ही उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सांगितली.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले
महाराष्ट्रातलं सर्व गुजरातमध्ये घेवून जाण्याचा डाव होता. त्याला आपण सतत विरोध केला. महाराष्ट्रातल्या उद्योगांवर डोळा होता. हे उद्योग गुजरातला जावू देत नव्हतो. महाराष्ट्राचं वाकडे होवू देत नव्हतो. महाराष्ट्राचा दरारा दिल्लीत निर्माण केला होता. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नव्हता. हे मोदी आणि शाह यांना दिसत होते. त्यामुळे सरकार पाडण्याचा डाव केला गेला. त्यांनी महाराष्ट्रा बरोबर गद्दारी केली. त्यांना महाराष्ट्राचं लुटून गुजरातला न्यायचा आहे. त्यासाठी त्यांच्या चेल्याचपाट्यांना मुख्यमंत्री केलं गेलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान या वेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही वक्तव्य केलं. या योजनेनं घर चालतं का? तुम्ही समाधानी आहात का? जर तुम्ही समाधानी असाल तर सर्व सुखात सुरू आहे. तसं असेल तर मी एकही उमेदवार देणार नाही असं ते यावेळी म्हणाले. शिवाय एकीकडे योजना देतात तर दुसरीकडे महागाई वाढवत आहेत. ती मात्र कोणी रोखताना दिसत नाही. एकीकडे पैसे खायचे दुसरीकडे महागाई करायची. मुलींची सुरक्षाही वाऱ्यावर आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे असं ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world