लोकसभा निवडणूक - प्रकाश आंबेडकरांचं 'प्रेशर' कोणावर? 'या' चिन्हावर लढणार निवडणूक

महाविकास आघाडीत प्रवेश मिळवण्याच्या वाटेवर असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) चर्चा फिस्कटल्यामुळे माघारी परतले आणि वंचितने पुन्हा स्वतंत्र लढायचा निर्णय घेतल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीची (MVA) डोकेदुखी वाढली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
अकोला:

२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाची चांगलीच चर्चा सुरु आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी खोऱ्याने मतं घेतली, ज्याचा अनेक जागांवर थेट फायदा भाजपच्या उमेदवारांना झालेला पहायला मिळाला. ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणूनही संबोधण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीतही वंचितने राज्याच्या राजकारणात आपलं महत्व कायम राखलं आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत दाखल झालेल्या वंचितने जागावाटपावरची चर्चा फिस्कटल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.

अवश्य वाचा - कल्याणमध्ये चक्र फिरली, गणपत गायकवाडांचा मोठा निर्णय

पक्षाचे मुख्य नेते प्रकाश आंबेडकर हे यंदाही अकोला लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांना अखेरीस निवडणुक चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. प्रेशर कुकर या चिन्हावर आंबेडकर यांना ही निवडणुक लढवावी लागणार आहे. वंचितकडून गॅस सिलेंडर या चिन्हाला पहिली तर रोड रोलर या चिन्हाला तिसरी पसंती मिळाली होती. परंतु त्यांना प्रेशर कुकर या चिन्हावर समाधान मानावं लागलं आहे.

स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमुळे महायुती-महाविकास आघाडीवर वंचितचं 'प्रेशर' -

जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात होण्याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत येण्यासाठी उत्सुकता दर्शवली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांमधली चर्चेनंतर अखेरीस वंचितला महाविकास आघाडीत प्रवेशही देण्यात आला. इतकच नव्हे तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप जेव्हा मुंबईत झाला तेव्हाही प्रकाश आंबेडकर India आघाडीच्या मंचावर उपस्थित होते. परंतु लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर वंचित आणि इतर पक्षांमधली चर्चा फिस्कटली. शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात यादरम्यान वाकयुद्धही रंगलं. प्रकाश आंबेडकर यांनी यादरम्यान काँग्रेसला काही जागांवर पाठींबा देण्याचा प्रस्ताव दिला. परंतु ही चर्चाही निष्फळ झाल्याने वंचितने पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.

अवश्य वाचा - जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतले सूर्याजी पिसाळ - आनंद परांजपेंची टीका

वंचितमुळे अकोल्याची निवडणुक पुन्हा तिरंगी -

अकोल्यातून भाजपने यंदा विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनूप धोत्रे तर काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कडवी लढत मिळू शकते. दरम्यान मागील 2019 च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना सोलापुर मतदारसंघात 'कपबशी' चिन्ह तर अकोल्यात 'गॅस सिलेंडर' चिन्ह मिळालं. अकोल्यातूनचं प्रकाश आंबेडकर 2014 च्या निवडणुकीत कपबशी तर 2009 मध्ये 'पतंग' चिन्हावर निवडणूक लढले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा प्रेशर कुकर कोणाची शिट्टी वाजवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement

अकोल्यात सध्या काय आहे परिस्थिती?

भाजपचे बंडखोर नारायण गव्हाणकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, काँग्रेसचे अभय पाटील यांच्या उमेदवारीनं यंदा भाजपाच्या मताधिक्यात फटका बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरु आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघाकड़ं राज्यासह देशाभराचं लक्ष असणार आहे. दिवसेंदिवस अकोला लोकसभा निवडणूक अतिशय रंजक होतांनाचं चित्र आहे.

2019 च्या निवडणुकीत अकोल्यात काय होती परिस्थिती? 

संजय धोत्रे : भाजप : 5,54,444
प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 2,78,848
हिदायत पटेल : काँग्रेस : 2,54,370