- तामिळनाडू विधानसभेत थलपती विजय यांना बहुमतासाठी ११८ आमदारांच्या लेखी पाठिंब्याची गरज आहे
- काँग्रेसच्या पाच आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय यांचा आकडा ११२ वर पोहोचला असून अजून सहा आमदारांची गरज आहे
- विजय यांनी PMK, CPI, CPM आणि VCK या लहान पक्षांशी सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू केली आहे
तामिळनाडू विधानसभेत 108 जागा मिळवूनही 'थलपती' विजय यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांनी एका जागेचा राजीनामा दिल्याने संख्याबळ 107 वर आले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही त्यांना 6 आमदारांची निकड आहे. राज्यपाल जोपर्यंत लेखी समर्थनाचा आग्रह धरत आहेत, तोपर्यंत विजय यांना मित्रपक्षांच्या अटी-शर्ती पूर्ण कराव्या लागतील. विशेषतः PMK आणि डाव्या पक्षांची भूमिका या सत्तासंघर्षात महत्त्वाची ठरणार आहे. बहुमताच्या आकड्यापासून ते अजूनही काही पावले दूर आहेत. सत्तास्थापनेसाठी विजय यांची सध्या कठीण परीक्षा सुरू असून लोकभवनातून अद्याप त्यांना बोलावणे आलेले नाही.
विजय यांची राज्यपालांशी दुसऱ्यांदा भेट
निकालानंतर तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. विजय यांनी दोनपैकी एका जागेचा राजीनामा दिल्याने त्यांच्या आमदारांची संख्या आता 107 झाली आहे. बुधवारी आणि गुरुवारी अशा दोन दिवसांत विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर करण्यास सांगितले असल्याचे समजते. मात्र, विजय यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा विश्वास राज्यपालांना दिला आहे. आपल्याकडे नंबर आहेत. शिवाय आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं आहे. पण त्याने राज्यपालांचे समाधान झाले नाही.
काँग्रेसचा पाठिंबा, पण अजूनही पेच कायम
विजय यांच्या पक्षाला काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे समर्थकांचा आकडा 112 वर पोहोचला आहे. मात्र, 234 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी अजूनही सहा आमदारांची गरज आहे. यासाठी विजय यांनी PMK, CPI, CPM आणि VCK या छोट्या पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. दुसरीकडे, AIADMK ने विजय यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर डीएमकेने ही आपली भूमीका स्पष्ट करत विजय यांना सत्ता स्थापनेची संधी दिली पाहीजे असं सांगितलं आहे.
लहान पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक
- VCK चा कौल महत्वाचा ठरणार आहे. दोन आमदार असलेल्या VCK पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी राज्यपालांची भेट घेऊन विजय यांना सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेची संधी देण्याची मागणी केली आहे.
- डावे पक्ष: CPI आणि CPM कडे प्रत्येकी 2 जागा आहेत. "सर्वात मोठ्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्याची संधी देणे हेच घटनात्मक आहे," अशी भूमिका CPI ने घेतली आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत डावे पक्ष आपला अंतिम निर्णय जाहीर करतील.
- PMK च्या अटी: 4 आमदार असलेल्या PMK ने पाठिंब्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद आणि एका रिक्त जागेची मागणी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपने PMK ला केंद्रात मंत्रिपद देऊन आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचेही वृत्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world