- राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान.
- एकूण १२३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मतदानासाठी १७३६७ कंट्रोल युनिट आणि ३४७३४ बॅलेट युनिटसह पुरेशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा उपलब्ध आहे.
राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक नगरपरिषदांमध्ये चुरशीच्या लढती होत आहे. महायुतीतल्याच घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण 17 हजार 367 कंट्रोल युनिट तर 34 हजार 734 बॅलेट युनिटचा समावेश आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मतदान पथके मतदान केंद्रावर सुरळित पोहचली आहेत. उद्या सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल. सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.
त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल. राज्यात अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. बहुशांत ठिकाणी महायुतीतल्या घटक पक्षांमध्येच चुरस असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जोर लावल्याचं चित्र आहे. स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी सर्वच पक्ष ताकद लावत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world