भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसला. भाजपाचं राज्यात तब्बल 14 जागांचं नुकसान झालं. या पराभवावर मंथन करण्यासाठी तसंच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपा कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये झाली. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी झालेल्या या बैठकीत कशावर चर्चा झाली? याबाबतची माहिती NDTV मराठीच्या हाती लागली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशावर झाली चर्चा?
राज्याच्या कोअर कमिटीच्या या बैठकीला जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार हे नेते उपस्थित होते.
या बैठकीत समन्वयाच्या अभावावर भाजपा पक्षश्रेष्ठींनी बोट ठेवले. आता केंद्रीय नेतृत्त्व राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. दिल्लीतील कोअर कमिटीच्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील उणीवांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर विरोधकांना हलक्यात घेऊ नका, असंही पक्षश्रेष्ठींनी बजावल्याची माहिती आहे.
( नक्की वाचा : भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय )
स्थानिक मुद्दे खोडून काढण्यात अपयशी ठरू नका.महाराष्ट्रातील सर्व भाजप नेत्यांना सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापासूनच उमेदवार तयार करा आणि विधानसभेच्या तयारीला लागावं. राज्यातील सर्व नेत्यांनी सक्रीय व्हावं अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत जे घडले त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार नाही, याची दक्षता घ्या, असंही या बैठकीत भाजपाच्या हायकमांडनं राज्यातील नेत्यांना सांगितलं आहे.
( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
विदर्भातील कापूस, सोयाबीन, उत्तर महाराष्ट्रात कांदा, तर संविधान बदल, आरक्षण रद्द या मुद्द्यांवर चर्चा झाली. विरोधकांचा नरेटीव्ह खोडण्यात महायुती अपयशी पडल्याचं या बैठकीत मान्य करण्यात आले, अशी माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली आहे.