स्वानंद पाटील
परळी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी राजकीय खेळी करत मुंडे यांच्या विरोधात मराठा उमेदवार दिला.धनंजय मुंडे यांनी लोकसभेत पंकजा मुंडे यांना ज्याप्रमाणे हरवले गेले तसाच माझाही पराभव करण्याचा डाव होता.मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला.इतकचं नाही तर शरद पवार यांनी परळीत येऊन सभा घेत धनंजय मुंडे यांच्या पुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण धनंजय मुंडे यांनी, पवारांनी माझी जात काढली पण मी जातीवर, धर्मावर राजकारण करणार नाही तर त्यांनी स्वतः केलेल्या विकासाचा पाढा वाचला. एकाही राज्य किंवा राष्ट्रीय नेत्याची सभा त्यांनी घेतली नाही. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनीच संपूर्ण प्रचार केला.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजार 224 मतांनी दारुण पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस यांनी मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत असल्याचे आपल्या भाषणात वेळोवेळी सांगितले. इतकच नाही तर पंकजा मुंडे यांनी हा पराभव करण्यासाठी भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचाही प्रचार केल्याचा मोठा आरोप आपल्या विजयी सभेत केलेल्या भाषणात केला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे,भाजपाचे बंडखोर भीमराव धोंडे असे तीहेरी आव्हान असतानाही त्यांनी 77975 ऐवढे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय मिळवला.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?
मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थळ असलेल्या अंतरवाली सराटीच्या बाजूला असलेल्या गेवराई मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांनी आपला विजय खेचून आणला. काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढाई येथे झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभे असलेले बदामराव पंडित यांच्यासाठी खुद्द आदित्य ठाकरे यांनी गेवराई सभा घेतली होती.असे असतानाही विजयसिंह पंडित यांनी काका बदामराव पंडित आणि अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार यांचा पराभव करत 42,390 मतांनी आपला विजय नोंदविला. या ठिकाणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारासाठी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सभा घेतली होती.याचा फारसा फरक मतदार संघावर पडला नसल्याचे दिसून आले.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली
मराठा आंदोलनाच्या धग जाणवलेल्या माजलगावात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आकाश सोळंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मराठा बहुल मतदार संघ असलेल्या या मतदार संघात लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना या मतदार संघातून लीड मिळाले होते.शरद पवारांनी या ठिकाणी दिलेली सभा ऐन वेळेला रद्द केली अन् या ठिकाणचे वारे फिरल्याची चर्चा मतदारसंघात रंगली. या मतदारसंघात सुप्रिया सुळेनी सभा घेतली. मात्र प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा 5899 मताधिक्यांनी पराभव केला.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं, काय बोलले होते शिंदे?
महायुतीच्या जागा वाटपात भाजपला केवळ आष्टी आणि केज या मतदारसंघाच्या दोनच जागा मिळाल्या. केज मतदार संघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या सासऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जनता नाराज असल्याचे आरोप विरोधकांनी केले. हे सर्व आरोप मतदारांनी धुडकावल्याचे दिसून आले.तसेच मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी घेतलेली सभा निर्णायक ठरली. मुंडे यांनी घेतलेल्या सभेमुळे त्या परिसरातील बहुतांश मतदान हे मुंदडांना मिळाले. मतमोजणीत शेवटच्या फेरीपर्यंत या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले. मतमोजणी होत असताना नमिता मुंदडा यांनी अटीतटीच्या लढाईत विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराजय केला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे गाव आणि एकवटलेले विरोधक असे असतानाही त्यांना मुंदडा यांचा विजयरथ रोखता आला नाही.
ट्रेंडिंग बातमी - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीला फक्त एकच जागा राखता आली. ती म्हणजे बीडची. बीड मतदारसंघात दोन पुतणे विरुद्ध काका अशी लढत होणार होती. असे दिसतानाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी त्यांचा पाठिंबा योगेश क्षिरसागर यांना दिला.तसेच संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी देखील योगेश क्षीरसागर यांचाच प्रचार केला. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांचा 6881 मतांनी पराभव करत आपली आमदारकी कायम राखली. संदीप क्षीरसागर यांचा मतदार संघात असलेला व्यक्तिगत संपर्क यामुळेच त्यांना तो विजय मिळाल्याचे बोलले जात आहे.