महायुतीमध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अजूनही निश्चित नाही. हा मतदार संघ मिळावा म्हणून शिवसेना शिंदे गट आणि भाजप आग्रही आहेत. शिवसेनेला उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी ही जागा हवी आहे. तर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना या मतदार संघातून रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत निलेश राणे यांनी या मतदार संघात कोण उभे राहाणार आहेत हेच एका मेळाव्यात जाहीर केले. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. जागा अजून कोणाला जाणार हे ठरले नसतानाही उमेदवाराचे नाव जाहीर केल्यामुळे तिढा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
राणेंनी थेट उमेदवाराचे नाव घेतले
महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात सध्या मेळावे घेतले जात आहे. हा मतदार संघ अजून कोणाच्याही वाट्याला गेलेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून आपापल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. सिंधुदुर्गच्या ओरसमध्ये भाजपने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यामेळाव्यात माजी खासदार निलेश राणे यांनी भाषणा वेळी उमेदवार कोण असेल तेच जाहीर करून टाकले आहे. या मतदार संघातून नारायण राणे उभे राहणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू घसरली आहे असे वक्तव्य केले. शिवाय नारायण राणेंनी कोकणासाठी भरपूर काही केले आहे त्यामुळे आता त्याची परतफेड मताच्या रूपाने करा असे आवाहन ही त्यांनी केले. त्यामुळे राणे हेच रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवार असतील याचे संकेत त्यांनी दिले आहे.
राणेंच्या वक्तव्याने तिढा वाढणार?
या मतदार संघातून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मुळात ही जागा शिवसेनेची असल्याने ती आपल्याला सुटावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदेंची आहे. याजागेबाबत अजून ही कोणता निर्णय झालेला नाही. त्याच वेळी निलेश राणे यांनी नारायण राणेच उभे राहाणार असल्याचे सांगितल्यामुळे शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे. एकीकडे नाशिक, ठाणे, पालघर, संभाजीनगर या जागांबाबत निर्णय होत नाही. तोच रत्नागिरीबाबत वक्तव्य आल्याने आणखी एक जागा हातून जाणार का? या विचारात शिंदे गट पडला आहे.
मविआकडून विनायक राऊत मैदानात
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे. सलग दोन वेळा त्यांना यामतदार संघातून विजय मिळवला आहे. दोन्ही वेळा त्यांनी निलेश राणे यांचा पराभव केला. यावेळी हॅट्रीक करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र अजूनही महायुतीने त्यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेला नाही.