कल्याण लोकसभेच्या जागेवरून महायुतीत ओढाताण होती. ही जागा भाजपला मिळावी म्हणून भाजपचे स्थानिक नेते आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे शिवसेनेच्या पहिल्या यादीत कल्याणच्या उमेदवाराची घोषणा होवू शकली नाही. त्याच वेळी उलटसुलट चर्चांना सुरू झाली होती. ही जागा एकनाथ शिंदेंना भाजपसाठी सोडावी लागणार असचं बोललं जात होतं. मात्र या सर्व चर्चांना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुर्ण विराम दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंही जागा कोणाला मिळणार हे स्पष्ट झालं आहे.
कल्याणची जागा कोणाला?
कल्याण लोकसभेत मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे कल्याणची जागा शिंदे गटालाच मिळेल हे नक्की होतं. पण पहिल्या यादीत कल्याणचा समावेश नव्हता. त्याच वेळी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. भाजप या जागेसाठी आग्रही होती. कल्याणच्या बदल्यात ठाणे देण्याची चर्चाही होती. पण शिंदे दोन्ही जागांसाठी आग्रही होते. त्यामुळे श्रीकांत शिंदेंचे काय होणार याची जोरदार चर्चा होती. मात्र या सर्व चर्चेला आता फडणवीसांनीच पुर्ण विराम दिला आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असंही ते म्हणाले. नागपूरात ते बोलत होते. फडणवीसांच्या या वक्तव्या मुळे कल्याण लोकसभेबाबतचा सस्पेन्स दुर झाला आहे.
श्रीकांत शिंदेंचा प्रचार न करण्याचा ठराव
दरम्यान श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी विरोध केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कल्याण पुर्वच्या भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. या बैठकीत हा मतदार संघ भाजपलाच मिळावा असा ठराव करण्यात आला. जर हा मतदार संघ श्रीकांत शिंदेंसाठी सोडला गेला तर भाजप कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार नाही असाही ठराव केल्याचं समजत आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना मतदार संघ जरी सुटला असला तरी त्यांच्या समोरील अडचणी मात्र वाढल्या असल्याची चर्चा आहे.
स्थानिक भाजप नेते काय म्हणतात?
लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा ही स्थानिक नेत्यांची मागणी आहे. अशी मागणी करणं गैर नाही अशी प्रतिक्रीया भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी दिली आहे. महायुतीकडून जो उमेदवार रिंगणात असेल त्याला आम्ही विजयी करू असंही ते म्हणाले. दरम्यान कल्याण पुर्वेला भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली याबाबत काही माहित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय गणपत गायकवाड यांच्या सोबत सर्वच भाजप पदाधिकारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे तोडगा काढणार?
भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रीकांत शिंदें बाबत नाराजी आहे. ही नाराजी दुर करण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर येवून ठेपली आहे. त्यामुळे ते नाराज भाजप कार्यकर्त्यांची नाराजी कशी दुर करतात हे आता पाहावं लागेल.