... म्हणून लोकसभा निवडणुकीत BJP ला फटका, RSS च्या मुखपत्रानं टोचले भाजपाचे कान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधील लेखात भाजपाच्या चुकांचा पाढा वाचण्यात आला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


गेल्या दोन निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपाची या निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024 Result) भाजपाला 240 जागा मिळाल्या आहेत. गेल्या लोकसभेपेक्षा पक्षाचं संख्याबळ 63 जागांनी घटलंय. भाजपाच्या या कामगिरीचं देशभरातून विश्लेषण सुरु आहे. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधील लेखात भाजपाच्या चुकांचा पाढा वाचण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भाजपासाठी रिअ‍ॅलिटी चेक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. त्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविशावासामुळेच निवडणुकीचे या पद्धतीनं निकाल लागला आहे, भाजपा कार्यकर्ता लोकांचं मत समजून घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन फॉलोईंगचा आनंद घेत होते, असं मत या लेखात व्यक्त करण्यात आलंय. 

भाजपा नेत्यांनी निवडणुकीच्या दरम्यान मदतीसाठी स्वसंयेवकांशी संपर्क केला नाही. त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं नाही. या नेत्यांनी 'सेल्फी' च्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जास्त विश्वास ठेवला. हा निवडणूक निकाल भाजपासाठी एक रिअ‍ॅलिटी चेक आहे, असं या लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे. 

( नक्की वाचा : Modi 3.O : मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रिपद? एका क्लिकवर पाहा संपूर्ण खातेवाटप )
 

भाजपाचे मंत्री सोडा आमदार किंवा खासदारही हे सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांच्या संपर्कात नव्हते. भाजपाचे लोकप्रतिनिधी मतदारसंघात उपलब्ध का नव्हते? मिळालेल्या मेसेजना उत्तर देणं त्यांना का इतकं अवघड होतं? असा प्रश्न शारदा यांनी विचारलाय.

Advertisement

महाराष्ट्रात पराभव का झाला?

महाराष्ट्रातील खराब कामगिरीचं या लेखात करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी केल्यानं महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्ते दुखावले हेले. या निर्णयामुळे राज्यातील भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. भाजपा हा इतर पक्षांसारखाच कोणताही फरक नसलेला पक्ष बनला. 

भगवा दहशतवादाचं मिथक तयार करणाऱ्या, मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट असं जाहीर करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनाही भाजपानं पक्षात प्रवेश दिला, असं शारदा यांनी कुणाचंही नाव न घेता या लेखात लिहिलं आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
 

लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पिछेहाटीचं कारण महाराष्ट्रामधील खराब कामगिरी हे देखील आहे. भाजपानं गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात 23 जागा जिंकल्या होत्या. यंदा पक्षाला फक्त 9 जागा मिळाल्या आहेत.