जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय?

ठाकरे गटाच्या आक्रमक पावित्र्यानंतर काँग्रेसचे नेते तातडीनं दिल्लीला पोहोचले. काँग्रेस निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली आणि त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राज्यातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं वेळापत्रक जाहीर करुन एक आठवडा उलटला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरणे ही सुरु केलं आहे. विधानसभा निवडणूक चुरशीही होणार याबाबत सर्वच विश्लेषकांमध्ये एकमत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. भाजपानं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. पण, दसऱ्याला यादी येईल असं जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीच्या यादीचा दिवाळी तोंडावर आली तरी पत्ता नाही.

का खोळंबली यादी?

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर वाद होतेच. या वादाला ठाकरे गट आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादामुळे फोडणी मिळाली. विदर्भातीाल जागावाटपाचा वाद इतका टोकाला पोहोचला की महाविकास आघाडीच्या बैठकाच थांबल्या. विदर्भातल्या जागांवरुन नाना पटोले आक्रमक होते. काही झालं तरी ठाकरे गटाला विदर्भातल्या जागा सोडायच्या नाहीत, अशी पटोलेंची भूमिका होती. पटोलेंच्या आडमुठेपणाला ठाकरे गट वैतागला आणि पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार करण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतला. त्याचबरोबर यापुढील बैठकांना नाना पटोले येणार असतील, तर ठाकरे गट येणार नाही, असा निरोपही ठाकरे गटानं दिला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काँग्रेसनं शोधला उपाय

ठाकरे गटाच्या आक्रमक पावित्र्यानंतर काँग्रेसचे नेते तातडीनं दिल्लीला पोहोचले. काँग्रेस निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली आणि त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस हायकमांडनं नाना पटोलेंना थेट सांगितलं, नाना तुम्ही थांबा, थोरातांना बोलू द्या. ठाकरे आणि पवारांशी वाटाघाटी करण्याचा चेहराच काँग्रेसनं बदलून टाकला. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर हायकमांडनं जागावाटपाची बोलणी करण्याची जबाबदारी सोपवली.

का बदलला चेहरा?

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही काँग्रेसनं ठाकरेंसमोर एक पाऊल मागे घेतलं, त्याला बरीच कारणं आहेत.  महाविकास आघाडी टिकावी ही काँग्रेस हायकमांडची इच्छा आहे. बाळासाहेब थोरात हा काँग्रेसचा शांत, संयमी आणि सर्वसमावेशक चेहरा आहे. ते सात टर्म काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसच्या हायकमांडशी थोरातांचे अत्यंत चांगले संबंध आहेत.

( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य )

2019 मध्येही ठाकरेंबरोबर सरकार बनवण्यात काँग्रेसचा कसा फायदा होईल, हे थोरातांनीच काँग्रेस हायकमांडला समजावून सांगितलं होतं.थोरातांचे ठाकरे आणि पवारांशी चांगले संबंध आहेत लोकसभा निवडणुकीत शिर्डीमधून ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंना थोरातांनी संगमनेरमधून चांगलं लीड देऊन विजयी केलं होतं. तर, नाना पटोलेंनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडल्यानं सरकार पडलं, अशीही एक चर्चा आहे या सगळ्या कारणांमुळे काँग्रेसनं खांदेपालट केला.बाळासाहेब थोरातांनी आधी शरद पवारांची आणि मग मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर सर्व काही ठीक आहे, असं स्पष्ट केलं.

चेहरा बदलला, तिढा सुटणार?

आम आदमी पक्षाबरोबर आघाडी  न करून हरियाणात नुकसान झाल्याचं काँग्रेसला उमगलंय. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याची रिस्क घेण्याच्या मूडमध्ये काँग्रेस नाही. आता चेहऱ्याच्या बाबतीत काँग्रेस एक पाऊल मागे आलंय. मात्र जागांच्या बाबतीत कोण मागे हटणार..... त्यावरच तिढा सुटणार की वाढणार हे ठरणार आहे.