लोकसभेत विरोधी पक्षनेता राहुल गांधींनी गुरुवारी लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यादरम्यान पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातलेले राहुल गांधी यांना शेवटून दुसऱ्या रांगेत बसवण्यात आलं होतं. त्यांना शेवटच्या रांगांमध्ये बसवण्यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान पुढील रांगांमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूंना बसण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. ज्यामुळे राहुल गांधींना मागील रागांमध्ये बसवण्यात आलं. अन्यथा प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्षनेता पुढील रांगांमध्ये बसतो.
यादरम्यान राहुल गांधींच्या आजूबाजूला ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू बसले होते. राहुल गांधी यांच्या अगदी पुढे ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी टीमचे सदस्य ललित उपाध्याय बसले होते. याशिवाय पुढील रांगांमध्ये मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, केंद्रीय मंत्री अमित शाह, एस. जयशंकर, निर्मला सीतारमण आणि शिवराज सिंह चौहान बसले होते.
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळादरम्यान विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सर्वात पुढील रांगेत बसवलं जात होतं. राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजनात बैठकीच्या व्यवस्थेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची असते.