Salman Khan Bigg Boss 18: लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगने सिद्दीकींची हत्या केल्याचा दावा केला आहे. यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव सलमान या आठवड्यामध्ये रिअॅलिटी शो बिग बॉस 18च्या 'वीकेंड का वॉर'मध्ये दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे.
(नक्की वाचा: बाबा सिद्दिकी शानदार इफ्तार पार्टींसाठी होते प्रसिद्ध, सलमान-शाहरुखमधील मिटवले होते मोठे भांडण)
सलमान खान शो होस्ट करणार नाही?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान खासगी तसेच सुरक्षेच्या कारणांमुळे बिग बॉस 18 शोमधील वीकेंडचे सेगमेंट होस्ट करणार नाही. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 6 ऑक्टोबरला बिग बॉस सीझन 18चा ग्रँड प्रीमिअर पार पडला. यानंतर सलमान खान दुसऱ्यांदा वीकेंड का वार होस्ट करणार होता. पण बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळे सलमान खानला कथित स्वरुपात मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
(नक्की वाचा: ...तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, धमकीसत्र सुरूच)
अरबाज खानने व्यक्त केली चिंता
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटर्सने एप्रिल महिन्यामध्येही सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. यानंतर 12 ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली. यानंतर अरबाज खानने भाऊ सलमान खानच्या सुरक्षेसंदर्भातही चिंता व्यक्त केली.
(नक्की वाचा: काळविटाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई 5 वर्षांचा होता, राम गोपाल वर्माने उपस्थित केले अनेक प्रश्न)