Bigg Boss 19 : छोट्या पडद्यावर सध्या फक्त 'बिग बॉस-19' या रियालिटी शोची हवा आहे. दररोज होणारे नवे खुलासे आणि हाय-व्होल्टेज ड्रामामुळे हा शो चर्चेत आहे. स्पर्धकांमधील नवे नातेसंबंध आणि भांडणे याचा प्रेक्षक अनुभव घेत असतानाच, आता थेट शोच्या टॉप-3 फायनलिस्टची नावे सोशल मीडियावर लीक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
या व्हायरल झालेल्या माहितीमुळे बिग बॉसचा हा सिझन 'स्क्रिप्टेड' आहे का, असा सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत.
कोण होणार विनर?
सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस-19' च्या विकिपीडिया पेजचा एक स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये केवळ टॉप-3 फायनलिस्टची नावेच नव्हे, तर विजेत्याचे नावही स्पष्टपणे जाहीर करण्यात आले आहे. या लीक झालेल्या लिस्टनुसार, 'अनुपमा' मालिकेतील स्टार गौरव खन्ना हा 'बिग बॉस-19' चा विजेता ठरणार आहे.
विनर (Winner): गौरव खन्ना
फर्स्ट रनर-अप (First Runner-up): अमाल मलिक
सेकंड रनर-अप (Second Runner-up): अभिषेक बजाज

हा स्क्रीनशॉट पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले असून, तान्या मित्तल (Tanya Mittal) हिचा टॉप-5 मध्येही समावेश नसेल, असे या माहितीनुसार स्पष्ट होत आहे.
स्क्रिप्टेड' शोच्या चर्चांना उधाण
सध्या शोमध्ये अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांचे नवे 'भाऊ-बहिणीचे' नाते आणि मालती चहर (Malti Chahar) चे नवे सीक्रेट कनेक्शन यांसारख्या गोष्टींची चर्चा सुरू आहे.
एका बाजूला, अमाल मलिक (Amaal Mallik) एका मोठ्या फिल्मी घराण्यातून असल्यामुळे आणि लोकप्रिय असल्यामुळे त्याला अधिक 'लाइमलाइट' आणि 'इश्यू' दिले जात आहेत, जेणेकरून तो शोचा विजेता ठरू शकेल, अशा चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहेत. परंतु, विकिपीडिया पेजवर झालेला हा कथित 'लीक' काहीतरी वेगळेच चित्र दाखवत आहे.
( नक्की वाचा : Govinda Affair: 'गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर...', पत्नी सुनीता आहुजाचा धक्कादायक गौप्यस्फोट )
काय आहे सत्यता?
विकिपीडिया पेजवर ही माहिती रोज अपडेट होत असते, असे मानले जाते. या माहितीच्या आधारावर 'बिग बॉस'चा निकाल लागण्यापूर्वीच ही नावे जाहीर होणे खरोखरच धक्कादायक आहे.
सोशल मीडिया युजर्सनी या लीक झालेल्या लिस्टच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विकिपीडियासारखे पेज कोणीही एडिट करू शकते आणि हे व्हायरल झालेले स्क्रीनशॉट कदाचित फेक किंवा केवळ प्रँकचा एक भाग असू शकतात, असे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.
मात्र, जर ही माहिती खरी असेल, तर 'बिग बॉस' हा शो ठरलेल्या स्क्रिप्टनुसारच चालतो आणि प्रेक्षकांचे मत अंतिम निकालासाठी फार महत्त्वाचे नसते, असा निष्कर्ष काढला जात आहे. या लीकमुळे शोच्या निष्पक्षतेवर (Fairness) मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world