बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञातांनी चार गोळ्या झाडून तेथून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. यामुळे बॉलिवूडसोबत राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करतच आहे. मात्र आता हे प्रकरण अधिकृतपणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. सकाळपासून गुन्हे शाखाही तपास करत होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गोळीबार करताना वापरलेली दुचाकी पनवेलची नोंदणीकृत आहे. असं बघायला गेलो तर, सलमान खानचे फार्म हाऊसही पनवेलमध्ये आहे.
पोलीस दुचाकी मालकाची माहिती काढत आहेत. ही दुचाकीही चोरीची असावी, असा पोलिसांना संशय आहे. दोन्ही आरोपी माउंट मेरी चर्चजवळ दुचाकी ठेवून निघून गेले. त्यानंतर त्यांनी ऑटोरिक्शा किंवा इतर सार्वजनिक वाहनाचा वापर करत वांद्रे रेल्वे स्थानक गाठले. तिथून ते दोघे लोकल ट्रेन पकडून अंधेरीच्या दिशेने निघून गेले. दोघेही मुंबई शहराबाहेर गेल्याचे मुंबई पोलिसांना संशय आहे. पण ते दोघे रस्त्याने गेले की ट्रेनने हे अजून स्पष्ट झालेले नाही.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांनी वाढवली सुरक्षा
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर सलमान खानला कोणाचा जास्त धोका आहे? खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीपासून मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि भारत-कॅनडाचा वॉन्टेड गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
गोळीबाराच्या वेळेस सलमान खान घरातच होता, लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला
गोळीबाराची घटना समोर येताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच सलमान खानशी फोनवरुन संवाद साधत त्याची विचारपूस केली तर, संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनीही सलमान खानची भेट घेतली होती.