Gharoghari Matichya Chuli TV Serial: स्टार प्रवाह मराठी मनोरंजन वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेमध्ये प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजवर आपण मालिकेच्या कथानकात आलेले लीप पाहिले आहेत. पण मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घरोघरी मातीच्या चुली मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांपूर्वीचा काळ दाखवला जाणार आहे. जानकी-ऋषिकेशच्या संसाराची गोष्ट आपण मालिकेच्या पहिल्या भागापासून पाहत आलोय.
मास्कमॅनचा मुखवटा उतरणार?
पण जानकी-ऋषिकेशची भेट नेमकी कशी झाली? पहिली भेट ते लग्न हा प्रवास नेमका कसा होता? या प्रवासात नेमका कसा चढ-उतार होता? याची रंजक गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणार आहे. सध्या ऋषिकेश-जानकी आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या आयुष्यात ऐश्वर्या आणि मास्कमॅन नावाचे वादळ आहे. बारा वर्षांपूर्वी देखील ऋषिकेश-जानकीच्या प्रेमाच्या गोष्टीत मकरंद नावाचं वादळ होतं. हा मकरंद नेमका कोण? ऋषिकेश-जानकीच्या प्रेमात अडथळे आणण्यामागे त्याचा नेमका काय मनसुबा होता? याची उत्सुकता गोष्ट घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.
12 वर्षापूर्वी ऋषिकेश रणदिवे-जानकी कसे होते?
मालिकेतल्या या अनोख्या वळणाबाबत सांगताना ऋषिकेश म्हणजेच अभिनेता सुमीत पुसावळे म्हणाला, "मालिकेतल्या या नव्या कथानकासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आजवर मालिकेत प्रेक्षकांनी शांत, संयमी आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारा ऋषिकेश पाहिला आहे. पण 12 वर्षांपूर्वी ऋषिकेशचा स्वभाव फार वेगळा होता. पण या भूमिकेला खूप पैलू आहेत. बारा वर्षांपूर्वी जानकी – ऋषिकेश नेमके कसे होते? हे साकारताना खूप धमाल येणार आहे. लुक पण खूप छान झाले आहेत. प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक नक्की आवडेल याची खात्री आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
