
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie: झिम्मा, झिम्मा 2 आणि फसक्लास दाभाडे सिनेमाच्या यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे या लोकप्रिय जोडीचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' असे सिनेमाचे नाव असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आलीय. नुकतेच सोशल मीडियावर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करत व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' सिनेमा कोणत्या तारखेला होणार रिलीज
आता मराठी शाळा पुन्हा भरणार! असे म्हणत हा सिनेमा 1 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा गर्व या विषयांचा मनोरंजक तरीही हृदयस्पर्शी पद्धतीने घेतलेला वेध म्हणजे 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम'. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फळी झळकणार आहे.
'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' सिनेमातील स्टारकास्ट
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या सर्वांसोबत अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे.
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, "या चित्रपटाचा विषय माझ्या अगदी मनाजवळचा आहे. आपल्या मराठी शाळा म्हणजे आपली ओळख. या शाळांमधूनच अनेक पिढ्या घडल्या, अनेक नामवंत मंडळी तयार झाली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत आणि त्यांचं महत्त्व घटत चाललं आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या चित्रपटातून आम्ही या विषयावर मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्या याआधीच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी जितकं प्रेम केलं तितकंच ते याही चित्रपटावर करतील याची खात्री आहे."
(नक्की वाचा: Tharala Tar Mag Serial: दिवाळी मुहूर्तावर नव्या पूर्णा आजीची दिसली झलक, 'ठरलं तर मग' मालिकेच्या चाहत्यांसाठी खूशखबर)
क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' येत्या 1 जानेवारी 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world