Love Story: प्रेमाला वय नसतं. हे म्हणतात तेच खरं. अशीच एक घटना समोर आली आहे. 'लगान' चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांचा तो रोल सर्वांच्याच लक्षात राहीला. या चित्रपटात ज्या प्रमाणे छोटी छोटी पात्र होती त्या पैकीच त्याचं एक लक्षात राहणारं पात्र होतं. आता सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी चक्क वयाच्या 60 व्या वर्षी लग्न केलं आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ अतुल गुर्तू यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. नुकत्याच एका रेडिओ शो 'सुहाना सफर'मध्ये त्यांनी या अनोख्या प्रवासाचा खुलासा केला आहे.
'लगान' चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास 25 वर्षे झाली. तर सुहासिनी यांच्या सुखी संसाराला आता 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुहासिनी मुळ्ये यांनी सांगितले की, त्यांनी कधीच घाईघाईत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी थांबा आणि पाहा अशीच भूमीका लग्नाबाबत घेतली. समाजाचा दबाव होता. लग्न झालं पाहीजे असं सर्वांना वाटत होतं. पण त्यानी तसं केलं नाही. उलट योग्य जोडीदार मिळेपर्यंत त्यांनी वाट पाहिली. "मी 60 व्या वर्षी पहिल्यांदा लग्न केले. तोपर्यंत मला योग्य व्यक्ती भेटली नव्हती. माझे पती खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. जेव्हा ते विज्ञानावर बोलतात, तेव्हा मला काही समजत नाही, पण ते एक उत्तम माणूस आहेत," असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांची लव्ह स्टोरी ही भन्नाट आहे. त्या सांगतात की एका सहकलाकाराने त्यांना फेसबूकवर अकाऊंट काढायला सांगितले. त्यातून काम मिळेल असं ही त्यांना सांगण्यात आलं होतं. त्याच वेळी तिथे स्क्रोल करत असताना त्यांना अतुल गुर्तू यांचे प्रोफाइल दिसले. त्यांना ते इंटरेस्टींग वाटले. त्यावेळी अतुल हे 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' (LHC) प्रोजेक्टवर काम करत होते. विज्ञानात रस असलेल्या सुहासिनी यांनी कुतूहलाने त्यांना "LHC काय आहे?" असा मेसेज पाठवला. या मेसेज पासूनच या दोघांमधील संवाद सुरू झाला आणि पुढे ते बहरला.
फेसबुकवरील ही ऑनलाइन मैत्री हळूहळू बहरत गेली. या मैत्रिचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. काही महिने या दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग झाले. विचारांची देवाण घेवाण झाली. पुढे दोघांनी ही एकमेकांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. दोघे प्रत्यक्ष भेटले. ऐवढ्यावर ते थांबले नाही. 75 दिवसांत प्रेमानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2011 मध्ये ते विवाहबद्ध झाले. अतुल गुर्तू हे एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आहेत. सुहासिनी यांनी 'दिल चाहता है', 'जोधा अकबर', 'धमाल', 'प्रेम रतन धन पायो' आणि 'दे दे प्यार दे' यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world