- देऊळ बंद 2 मराठी सिनेमा केवळ एका मर्यादित बजेटमध्ये बनवला असून बॉक्स ऑफिसवर 80 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे
- शाहरुख खान सिनेमाचे 42 लाख रुपयांचे बिल माफ केले आणि निर्मात्यांना मोठी मदत केली
- प्रवीण तरडेंच्या म्हणण्यानुसार शाहरुख खानने पैशांपेक्षा सिनेमा महत्त्वाचा मानला
Deool Band 2 Movie: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला असून आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच मराठी सिनेमांच्या यादीत त्याने स्थान मिळवले आहे. केवळ 8 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने हा सिनेमा थिएटरपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली? थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवणाऱ्या या सिनेमाला रिलीजपूर्वी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने एका महत्त्वाच्या वळणावर मदत केली आणि 42 ते 45 लाख रुपयांचे बिल माफ करून मेकर्सची मोठी मदत केली.
'अभिजात मराठी फिल्मी'शी बोलताना तरडे यांनी सांगितले की, डिजिटल सिनेमा पॅकेज (DCP) जे थिएटर्समध्ये सिनेमा दाखवण्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल फॉरमॅट आहे, त्यासाठी शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या प्रोडक्शन हाऊसशी संपर्क साधला होता. जिथे निर्मात्यांनी या प्रक्रियेसाठी साधारण 12 लाख रुपयांचे बजेट ठेवले होते, तिथे त्यांना थेट 42 लाख रुपयांचे एस्टीमेट (अंदाजित पत्रक) देण्यात आले.
(नक्की वाचा : VIDEO: फुटपाथवर झोपला बॉलिवूडचा कॉमेडी किंग, अवस्था पाहून नेटकरीही हैराण; व्हिडीओ तुफान व्हायरल!)
शाहरुख खानच्या कंपनीने केली मदत | Deool Band 2 Shah Rukh Khan Help
त्या कठीण प्रसंगाची आठवण काढत तरडे म्हणाले की, "बिल 42 लाख रुपयांचे आले. आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि त्याची व्यवस्था करता येईल असा कोणताही पर्याय आमच्याकडे नव्हता. आम्ही रेड चिलीजशी संपर्क साधला आणि त्यांना आमच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. आम्ही त्यांना सांगितले की, हा एक मराठी सिनेमा आहे, प्रादेशिक सिनेमा आहे आणि आमचे बजेट मर्यादित आहे. पण आम्हाला तो मोठ्या प्रमाणावर रिलीज करायचा होता म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे मदतीची विनंती केली."
ही विनंती अखेर शाहरुख खानपर्यंत पोहोचली. तरडे यांनी सांगितले, "त्यांनी आपल्या टेक्निकल टीमला या प्रकरणाबद्दल विचारले. टीमने त्यांना सांगितले की, हे 'मुळशी पॅटर्न' बनवणाऱ्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 'मुळशी पॅटर्न'चा नंतर सलमान खानने 'अंतिम' नावाने रिमेक सिनेमा केल्यामुळे शाहरुख यांना आमचे काम माहिती होते. त्यानंतर त्यांनी 'देऊळ बंद 2' सिनेमाबाबत विचारले. त्यांच्या टीमने त्यांना सांगितले की, हा एक उत्तम दर्जाचा भावनिक सिनेमा आहे आणि निर्मात्यांना DCP हवा आहे, पण ते त्याचा खर्च उचलण्यास असमर्थ आहेत. DCP तयार होता, पण थकीत पैशांमुळे तो निर्मात्यांच्या स्वाधीन करण्यात आला नव्हता."
DCP म्हणजे काय?
DCP म्हणजेच डिजिटल सिनेमा पॅकेज, हे डिजिटल सिनेमा प्रोजेक्टरवर सिनेमा चालवण्यासाठी वापरले जाणारे एक विशेष फॉरमॅट आहे.
(नक्की वाचा : फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार)
प्रवीण तरडे यांच्या म्हणण्यानुसार, शाहरुख यांची प्रतिक्रिया तत्काळ आली. "ते फक्त एवढेच म्हणाले, 'त्यांचे बिल माफ करा.' त्यांनी टीमला सांगितले की, 'हा एक मराठी सिनेमा आहे. त्यांना DCP देऊन टाका. पैशांचा विषय नंतर काय तो मिटवू. जर सिनेमा चांगला असेल तर त्यांना DCP द्या.' त्यांनी मराठी सिनेमाबद्दल खूप आदर दाखवला. त्यांच्यासाठी पैशांपेक्षा सिनेमा जास्त महत्त्वाचा होता. मी या सिनेमाच्या यशाचे श्रेय या सर्व लोकांना देऊ इच्छितो."
शाहरुखने परिणामाची चिंता न करता केली मदत
तरडे म्हणाले की, ते या मदतीसाठी नेहमीच कृतज्ञ राहतील विशेषतः यासाठी कारण शाहरुखने ही मदत तेव्हा केली जेव्हा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल की नाही, हे कोणालाच माहीत नव्हते.
ते पुढे म्हणाले, "आज हा सिनेमा 100 कोटी रुपयांच्या क्लबच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. पण शाहरुख खानने तेव्हा जे केले त्यावेळेस हा सिनेमा काहीच नव्हता, जेव्हा तो चालेल की नाही हे कोणालाच माहीत नव्हते, ते कायम लक्षात ठेवले जाईल. यशाची कोणतीही हमी नसताना त्यांनी आम्हाला मदत केली. मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन." तसेच आपण स्वतः शाहरुख खान यांच्यासाठी या सिनेमा स्पेशल स्क्रीनिंग करू इच्छितो, असेही तरडे यांनी आवर्जून सांगितले.
'देऊळ बंद 2' चे कलेक्शन
इंडस्ट्री ट्रॅकर 'सॅकनिल्क' (Sacnilk) नुसार, 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) ने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 81.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वर्ष 2015 मध्ये आलेल्या मूळ सिनेमाच्या या सीक्वेलचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. 'देऊळ बंद 2' मध्ये स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहेत तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी मूळ सिनेमातील 'स्वामी समर्थ' यांची आपली भूमिका पुन्हा साकारली आहे. हा सिनेमा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संवेदनशील मुद्यावर भाष्य करतो आणि त्यासोबतच श्रद्धा- नास्तिकता यामधील गुंतागुंतीचा संबंधही पडद्यावर मांडण्यात आहे.