Mi Savitribai Jotirao Phule Serial: स्टार प्रवाहवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या जीवनातील संघर्षाचा, शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा आणि सामाजिक क्रांतीचा प्रवास आता नव्या उर्जेसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. या विशेष टप्प्यासाठी मराठीतील दोन दिग्गज कलाकार, डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांची मालिकेत एण्ट्री होत आहे.
सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष
सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांनी जातीभेद, अन्याय आणि अंधश्रद्धेच्या साखळदंडात अडकलेल्या समाजाला शिक्षणाची नवी वाट दाखवली. स्त्रियांना आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जो लढा दिला, तो आता मालिकेत अधिक प्रभावीपणे मांडला जाणार आहे.
उत्सुकता, हुरहूर आणि दडपण: मधुराणी गोखले
या भूमिकेबद्दल आपली भावना व्यक्त करताना अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाल्या की, "सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अशा संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे."
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले,"कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाइफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अश्या क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे.
(नक्की वाचा: Dhasal Marathi Movie: ललित प्रभाकर साकारणार विद्रोही कवी नामदेव ढसाळ! डॉ. आंबेडकर जयंतीला भव्य पोस्टर रिलीज)
आगामी भागांमध्ये सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांचा सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवास पाहायला मिळणार आहे. ही मालिका केवळ कथा म्हणून न राहता, एक सामाजिक चळवळ म्हणून प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच प्रभाव पाडेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world