Dhurandhar Part 2: Prepaid Views : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आज बुधवार १८ मार्च रोजी एक सुवर्णक्षण लिहिला जात आहे. 'धुरंधर पार्ट २' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये अशी काही क्रेझ निर्माण केली आहे, जी यापूर्वी कधीही पाहण्यात आली नव्हती. भारताच्या चित्रपट इतिहासात प्रथमच रिलीजच्या आधी चित्रपट पाहायला इतकी मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
अडीच हजारांचे तिकीट अन् प्रेक्षकांची झुंबड
भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असे घडत आहे की, चित्रपट अधिकृतपणे प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी प्रेक्षक चक्क २,५०० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम खर्च करून चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नागपूरसारख्या शहरातही या 'प्रीपेड व्ह्यूज'साठी ६०० ते १५०० रुपयांपर्यंत तिकीट दर मोजले जात आहेत. नागपुरात सहाशे ते दीड हजार रुपये प्रत्येक तिकिटासाठी मोजले जात आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोणतीही मोठी प्रमोशनल ॲक्टिव्हिटी किंवा टूर करण्यात आली नव्हती. तरीही केवळ 'प्रीपेड व्ह्यूज'च्या माध्यमातून या चित्रपटाने ४२ कोटींची कमाई केली आहे. यानिमित्ताने देशभरात आज सुमारे १२,००० हून अधिक प्रीमियर शोजचं आयोजन करण्यात आलं आहे.
'प्रीपेड व्ह्यूज' आणि पारदर्शकता
सहसा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 'कॉर्पोरेट ब्लॉक बुकिंग'द्वारे हाऊसफुल्लचे बोर्ड लावले जातात, ज्यामध्ये निर्माते स्वतःच तिकिटे विकत घेतात असा आरोप होतो. मात्र, 'धुरंधर पार्ट २' च्या बाबतीत वेगळं चित्र आहे. येथे प्रत्यक्ष प्रेक्षकांनी स्वतःच्या खिशातून महागडी तिकिटं विकत घेतली आहेत. हा कोणताही 'हाईप' निर्माण करण्याचा स्टंट नसून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचं म्हटलं जात आहे. उद्या १९ मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी आज १८ मार्चलाच प्रीपेड व्ह्यूजअंतर्गत प्रेक्षकांना चित्रपटाचा आस्वाद घेता येणार आहे. हा चित्रपट तब्बल ३ तास ५० मिनिटांचा आहे. पहिल्या भागापेक्षा (३ तास ३४ मिनिटे) हा भाग १५ मिनिटांनी अधिक मोठा असूनही, चाहत्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.
नागपुरात 'धुरंधर'चा डंका
नागपूरचे उद्योगपती विजय खेर हे मध्य भारतातील सी पी सर्किटच्या प्रमुख वितरकांपैकी एक मानले जातात. 'गदर एक प्रेम कथा' आणि अन्य कितीतरी ब्लॉक बस्टर चित्रपटांचे वितरक असलेले विजय खेर धुरंधर पार्ट टू च्या प्रीपेड व्ह्यूजला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंदित आहेत. मध्य भारताचे प्रमुख वितरक असलेले विजय खेर यांच्या मते, नागपुरात आज एकाच दिवशी १२० शोज होणार आहेत. जिओ सिनेमातर्फे प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहून अनुभवी वितरकही थक्क झाले आहेत.
चित्रपट तज्ज्ञांच्या मते, या यशामागे काही महत्त्वाची कारणं अधोरेखित करण्यात आली आहेत. पहिल्या भागाला मिळालेली प्रचंड पसंती, पहिल्या भागानंतर अवघ्या काही महिन्यातच दुसरा भाग प्रदर्शित याशिवाय हा चित्रपट हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही प्रदर्शित होत आहे. 'धुरंधर पार्ट २' उद्या १९ मार्च (गुढीपाडवा) रोजी अधिकृतपणे प्रदर्शित होत आहे. केवळ प्रीपेड व्ह्यूजच नव्हे, तर प्रदर्शनानंतरच्या 'ॲडव्हान्स बुकिंग'लाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भारतीय चित्रपट उद्योगासाठी ही एक अत्यंत सकारात्मक आणि लाभाची बाब मानली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world