Lagnacha Shot Movie: मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेल्या ‘लग्नाचा शॉट' या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. याच पोस्टरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांची नावं देखील समोर आलीयेत.
प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळणार आहेत. याआधी केवळ संकल्पना आणि शीर्षकामुळे उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाने आता पोस्टरद्वारे थेट लक्ष वेधून घेतले आहे.
प्रियदर्शिनी इंदलकर- अभिजीत आमकरची फ्रेश जोडी
या पोस्टरमध्ये पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेत दिसणारे नायक-नायिका जोडीने उभे आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव दिसतात. लग्नाच्या धावपळीत काहीतरी मोठा घोळ होणार असल्याची स्पष्ट झलक पोस्टरमधून दिसतेय.
लग्नाआधी आणि लग्नानंतरचा प्रवास?
पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचा रस्ता आणि राशीचक्र अशा दृश्यात्मक घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यात ‘लग्नाअगोदरही लग्नानंतरही' असे शब्दही दिसत आहेत. यामुळे प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे फेरे यांचा कथेशी असलेला संबंध सूचकपणे समोर येतो. संपूर्ण पोस्टर रंगीबेरंगी, उत्साही आणि गंमतीशीर वातावरण निर्माण करत असून, चित्रपटाचा हलकाफुलका आणि मनोरंजक सूर स्पष्ट करतो.
या पोस्टरबाबत बोलताना दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, ‘'लग्नाचा शॉट ही लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर नजरेने पाहाणारी गोष्ट आहे. कोणताही गंभीर संदेश देण्याचा अट्टहास न ठेवता, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल असा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. हलकंफुलकं, स्वच्छ आणि प्रामाणिक मनोरंजन हेच या चित्रपटाचं खरं बलस्थान आहे.”
(नक्की वाचा: Priyadarshini Indalkar Marriage : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचं लग्न ठरलं? कोण आहे तो नशीबवान?)
सिनेमा कधी होणार रिलीज?
महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म्स यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट' या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत, संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. तर अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती या चित्रपटाचे निर्माते आहेत. 6 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
