साठचे दशक हे मुंबईसह भारतासाठी विविध स्थित्यंतरांचे दशक म्हणून ओळखले जाते. इंग्रजांचा प्रभाव पूर्णपणे पुसला गेला होता आणि जनतेची सरकारे लोकांच्या अंगवळणी पडायला लागली होती. मुंबईसारखे शहर हे सगळ्यांना सामावून घेणारे, वेगाने धावणारे, जगातील प्रमुख शहरांपैकी एक असणारे आणि अशी विविध बिरूदं मिरवणाऱ्या शहरांपैकी एक घडत होते. सगळ्यांना सामावून घेताना मुंबई अघळपघळ पसरायला लागली होती. वरकरणी मुंबई शांत वाटत असली तरी तिच्या पोटामध्ये अस्वस्थ राजकीय, आर्थिक, सामाजिक चळवळींची वात पेटवणाऱ्या हालचाली सुरू होत्या. याच दशकात एक घटना घडली जिने फक्त मुंबईच नाही तर अख्खा देश हादरला होता. या घटनेमागे एक माणूस होता, जो तोपर्यंत कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. मात्र अचानक तो इतका प्रसिद्ध झाला की, संवादाची आजइतकी प्रभावी साधने नसतानाही देशभरात पोहोचला. या व्यक्तीचं नाव होतं रमण राघव. रमणच्या सैतानी कृत्यांमुळे त्याला भारताचा 'रिपर' (अमेरिकेत एक माथेफिरू सिरीअल किलर होता ज्याला जॅक द रिपर असं नाव पडलं होतं) असं टोपण नाव देण्यात आलं. पुढे त्याची बरीच टोपणनावे समोर आली ज्यात सिंधी दलवाई, थलवाई, अण्ण, थंबी, वेलूस्वामी, सायको रमण या टोपणनावांचा समावेश होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा तो काळ होता जेव्हा वृत्तपत्र हे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम होते. रेडियो बऱ्यापैकी घराघरात पोहोचला होता आणि टीव्ही हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे माध्यम होते. संवादाची प्रभावी आणि सतत माहितीचा मारा करणारी माध्यमे नसल्याने हा काळ अफवा वेगाने पसरण्याचा काळ होता, कारण त्या माहितीची खातरजमा करण्याचे प्रभावी साधन उपलब्ध नव्हते. अशा काळात रमण राघवचं नाव जनतेला कळालं होतं. 60 च्या दशकात रमण राघवने 3 वर्षे खून केले. 3 वर्षे पोलिसांना त्याचा पत्ता लागला नाही. एकदा तो पोलिसांना सापडला होता मात्र पुराव्याअभावी तो सुटला होता. 3 वर्ष एक माणूस एकामागोमाग एक खून करत सुटतो, त्याला पोलीस शोधू शकत नाही हे कळाल्यानंतर मुंबईकरांमध्ये साहजिकच अस्वस्थता निर्माण होण्यास सुरुवात झाली. संध्याकाळी 7 नंतर मुंबईकर आणि खासकरून मालाड, जोगेश्वरी, गोरेगाव भागातले नागरीक घराबाहेर पडण्यास घाबरायला लागले.
'शोले' चित्रपटात एक संवाद आहे ज्यात गब्बरसिंग हा डाकू त्याच्या सहकाऱ्यांना म्हणतो की त्याची इतकी दहशत आहे की आया-बाया त्यांच्या मुलांना घाबरून सांगतात की झोप नाहीतर गब्बर येईल. सलीम-जावेद यांनी बहुधा रमण राघवने घातलेल्या हैदोसानंतर निर्माण झालेल्या स्थितीवरून तर हा संवाद लिहिला नाही ना असा प्रश्न अनेकांना पडतो. रमण राघव महिला, पुरुष, लहान मुले, नवजात बालके कोणालाही सोडत नव्हता. या सगळ्यांना वाईट पद्धतीने ठार मारत होता आणि महिलांवर बलात्कारही करत होता. 27 मे 1968 रोजी पोलिसांनी अखेर रमण राघवला अटक केली. या घटनेला 56 वर्षे पूर्ण झाली आहेत. रस्त्यावर झोपलेल्या, दमल्या भागल्या जीवांना काही कळायच्या आतच रमण ठार मारायचा. वजनदार वस्तूने डोक्यावर वार करून तो त्यांना मारत असे. पोलिसांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ही त्याची मोडस ऑपरेंडी झाली होती. मारण्याच्या पद्धतीवरून पोलिसांना अंदाज यायचा ही का खून सिरीअल किलरनेच केला आहे. विशेष म्हणजे हे खून मालाड, जोगेश्वरी, गोरेगाव या भागातच होत होते.
(नक्की वाचा : काजोलची सहकलाकार नूर मालाबिका दासचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकत होता मृतदेह)
एक वेळ अशी आली होती ज्यावेळी रमण राघवला शोधण्यासाठी 2 हजार पोलीस रस्त्यावर उतरले होते. इतके पोलीस असून, 3 वर्ष सिरीअल किलर सापडत नाही म्हटल्यावर अफवा पसरण्यास सुरुवात झाली. एक अफवा अशी होती की या खुन्याकडे दैवी शक्ती आहे आणि खून केल्यानंतर मांजर किंवा पोपट बनून तिथून पळून जातो. या अफवांमुळे पोलिसांवरील दबाव वाढायला लागला होता. इतक्या मोठ्या संख्येने पोलीस रस्त्यावर उतरूनही मारेकरी सापडत नाही हे कळाल्यानंतर नागरिकांनी तुकड्या बनवून हातात लाठ्या-काठ्या घेऊन गस्त घालण्यास सुरुवात केली. रमण राघवने 1965 ते 1966 या काळात काही हत्या केल्या होत्या. या काळात त्याला पोलिसांनी भटकताना पकडले होते मात्र हत्यांशी त्याचा संबंध नसावा असे वाटून त्याला त्यांनी सोडून दिले होते. यानंतर रमण राघव काही काळ थंडावला होता. 1968 पासून रमणने पुन्हा एकदा हत्या करण्यास सुरुवात केली. 3 वर्षांच्या काळात काही जण असे होते ज्यांनी रमणला पाहिले होते. काही असे होते जे त्याच्या हल्ल्यातून वाचले होते. या सगळ्यांनी केलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी त्याचे चित्र तयार केले होते. या चित्रामुळे रमणला पकडणे थोडे सोपे झाले
छत्रीमुळे रमण सापडला
अलेक्स फिआल्हो हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. डोंगरीमध्ये ते कर्तव्यावर असताना त्यांना दुरून निळा शर्ट आणि हाफ पँट घातलेल्या धष्टपुष्ट माणूस चालताना दिसला. त्याच्या हातामध्ये छत्री होती. डोंगरीमध्ये पाऊस पडत नसताना एक माणूस छत्री घेऊन फिरत असल्याने आणि ती ओली असल्याने अलेक्स यांना संशय आला. सिरीअल किलरची केस गाजत असल्यामुळे अलेक्स यांच्याकडे संशयिताचे छायाचित्र सदैव असायचे. त्यांनी ते काढून बघितले आणि समोरच्या माणसाकडे पाहिले. आपल्याला जो माणूस हवाय तो हाच आहे याची खात्री पटल्यानंतर त्यांनी रमणला गाठलं आणि जीपमध्ये बसायला सांगितलं. कुठून आलास असं विचारलं असता त्याने चिंचोली, मालाडहून आल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर अलेक्स यांची खात्री झाली की खुनी हाच आहे.
( नक्की वाचा : अभिनेता ते नेता... सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजवणाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्र कनेक्शन )
कोंबडी आणि शरीरसुखाची मागणी
रमणची पोलिसांनी हरतऱ्हेने चौकशी केली मात्र त्याने नीट माहिती दिली नाही. एके दिवशी एका अधिकाऱ्याने त्याला सहज विचारलं की, 'तुला काय हवंय?' यावर तो पटकन म्हणाला की मला चिकन हवंय आणि एका वेश्येकडून शरीरसुख हवंय. यातली पोलिसांनी चिकनची मागणी पूर्ण केली. यानंतर रमणने पोलिसांना खोबरेल तेल कंगवा आणि आरसा मागितला. अंगाला आणि डोक्याला त्याने नीट तेल लावलं आणि व्यवस्थित भांग पाडून स्वत:ला आरशात पाहिलं. यानंतर त्याने पोलिसांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन टाकली. चौकशीत त्याने सांगितलं की त्याने त्याच्या बहिणीवर बलात्कार करून तिलाही ठार मारलं. आपण 41 जणांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. मात्र हा आकडा अधिक असावा असा अंदाज आहे.
मी 101 टक्के पुरुष आहे!
रमणने हत्या का केल्या हा पोलिसांना प्रश्न पडला होता. हा प्रश्न रमणला पोलिसांनी विचारला तेव्हा त्याने उत्तर दिलं की माझ्या मनामध्ये संदेश पाठवला जातो, मग मी पाठचा पुढचा विचार न करता हत्या करतो. रमणने एकदा असं म्हटलं की तो दुसऱ्या दुनियेच्या नियंत्याच्या कायद्याचा प्रतिनिधी आहे. एकदा त्याने सांगितलं की 'भारतात तीन सरकारे आहेत पहिले म्हणजे इंग्रजांचे, दुसरे काँग्रेसचे आणि तिसरे अकबरचे. ही तीनही सरकारे मिळून आपल्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया करणार आहेत आणि त्यांचा डाव मला समलिंगी बनविण्याचा आहे.' रमणला महिलांबद्दल प्रचंड तिटकारा आणि शरीरसुखाचे आत्यंतिक वेड होते. रमणविरोधात खटला चालला आणि त्याला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र तो मनोरुग्ण असल्याकारणाने त्याला जन्मठेप सुनावण्यात आली. पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्याने जवळपास 18 वर्षे घालवली. 1995 मध्ये रमण किडनी फेल झाल्याने दगावला.
( नक्की वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा, 10 तोळे सोने लंपास )
बॉलीवूड अभिनेत्याला रमण समजून लोकांनी घेरलं
रमण ज्या काळात पोलिसांना सापडत नव्हता तेव्हा रस्त्यावरचे भिकारी आणि भटक्या माणसांना मुंबईतील गस्त घालणारे नागरीक संशयावरून पकडून बेदम मारहाण करत होते. रमण कसा दिसतो हे माहिती नव्हतं, त्यामुळे कोणीही संशयास्पदरित्या दिसला तर त्याला घेरले जाई आणि त्याला मारहाण होई. पुण्याच्या एफटीआयआयमधून बाहेर पडलेल्या अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या चेहऱ्याची ठेवण ही वेगळी होती. ओठाखालचा जखमेचा व्रण, वाढलेली दाढी, मिशा यामुळे ते गुंडासारखे वाटायचे. सिन्हा हे वांद्रेतील लिंकिंग रोडवर फिरत होते. यावेळी लोकांना संशय आला की हा माणूस हाच रमण राघव आहे. बघता बघता लोकं जमा झाले आणि त्यांनी सिन्हा यांना घेरले. शत्रुघ्न सिन्हा कसेबसे त्या घोळक्यापासून स्वत:चा बचाव करत रस्त्यावरून जाणाऱ्या एका टॅक्सीत घुसले. जर तिथे ती टॅक्सी नसती तर जमावाने त्यांचे काय केले असते याची कल्पनाही करवत नाही.