Maharashtra Budget 2024 : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी (28 जून) सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाची जोरदार पाठराखण केली आहे. या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलंय.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी सर्वांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. 'लाडकी बहीण ही योजना अत्यंत महत्त्वाची असून यामधून महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षभरात तीन सिलेंडर गॅस देण्यात येणार असून त्यामुळे विरोधक गॅसवर येणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात येणार आहे. लाडका भाऊ का नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. त्यावर लाडका भाऊ योजना देखील आहे. आम्ही वर्षाला 10 हजार देत आहोत. पण, त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय? असा टोला शिंदे यांनी लगावला. हा दादांचा अर्थसंकल्प आहे. दादा वादे का पक्का आहे, असं प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिलं.
( नक्की वाचा : 'हिंदुत्व सोडलं का?', बजेटवर टीका करताना उद्धव ठाकरे असं का म्हणाले? )
आम्ही एनडीएआरएफचे निकष बदलले आहेत. खोटं बोला पण रेटून बोला असं यांचं आहे. बियाण्यांवर जीएसटी नाहीच. चादर फाटल्यानं सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरुवात केली, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर याकूब मेनन आणि औरंगजेबला मनाने फादर मानणाऱ्यांना चादरच दिसणार, अशी टीका शिंदे यांनी केली.
2017 पासून दरडोई उत्पन्नात आपण सहाव्या क्रमांकावर आहोत. खोट्या नरेटिव्हवर विश्वास ठेवू नका. हे सर्व लोकसंख्येवर अवलंबून असतं.विधानसभेत या सर्वांचा पर्दाफाश करणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
( नक्की वाचा Maharashtra Budget 2024 मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा )
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत अर्थसहाय्य वाढविणे, विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर घरकुले बांधण्यासाठी तरतूद करणे, दिव्यांग व्यक्तींसाठी “धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना यामुळे दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी राज्य शासनाने खंबीर पाऊले टाकली असल्याचे स्पष्ट होते असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण ४४९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत २३ हजार किमी रस्त्यांची कामे, महापालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविणे, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेत ग्रामपंचायत कार्यालये बांधणे आणि इतरही प्रमुख पायाभूत्त सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असल्याने राज्याचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.