Saving Tips : सध्या महागाईच्या काळात सेविंग्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. कधी संकट ओढवेल काही सांगता येत नाही. अशावेळी सेविंग्ज तुमच्यासाठी मोठा आधार असतो. मात्र कमी पगारात सेविंग्स कसं करावं आणि महिन्याभराचा खर्च कसा पूर्ण करावा असा प्रश्न अनेकदा आपल्या डोक्यात घोंगावत राहतो. जास्त पगार असणाऱ्यांसाठी बचत करणं सोपं असू शकतं, मात्र कमी पगार असणाऱ्यांसाठी बचत करणं हे मोठं आव्हानात्मक काम आहे. जर तुमचा पगार ३० हजार किंवा त्याच्या जवळपास असेल तर बचत कशी कराल याबाबत जाणून घेऊया.
महिन्याचं बजट कसं तयार कराल? | How Do I Create My Monthly Budget?
महिन्याच्या ज्या तारखेला तुमचा पगार येतो, त्याच दिवशी महिन्याभराचा पूर्ण बजेट तयार करा. यासाठी तुम्ही ५०-३०-२० फॉर्म्युलेचा वापर करू शकता.
- ५० टक्के म्हणजे १५,००० रुपये घराचं भाडं, किराणा, वीज, पाणी आणि दुसऱ्या आवश्यक वस्तूंसाठी खर्च करा.
- ३० टक्के म्हणजे ९,००० रुपये ईएमआय, इन्शूरन्स, कुटुंबाचा खर्च, फिरण्याचा खर्च आणि बाहेर खाण्याच्या खर्चासाठी राखून ठेवा.
- २० टक्के म्हणजे ६,००० रुपये थेट बचत खात्यात टाका.
पगाराच्या ५० टक्के भागाचा असा करा वापर...
जर तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल तर ३० हजारांच्या पगारात खर्च करणं सोपं नाही. अशावेळी महागड्या घराऐवजी कमी भाडं असलेल्या घराची निवड करा. जर तुम्ही एकटे राहत असाल तर शेयरिंग फ्लॅटची निवड करू शकता. यामुळे भाडं, वीज, पाणी आणि दुसऱ्या सुविधांचा खर्च अर्धा होतो.
याशिवाय किराण्यासाठी प्रत्येक महिन्याला साधारण ५ ते ६ हजार रुपयांचा बजट ठरवा. येण्या-जाण्यासाठी १५०० ते २००० रुपये वेगळे ठेवा आणि संपूर्ण महिन्याचा प्रवासाचा खर्च याच बजटमध्ये होईल यासाठी प्रयत्न करा.
पगारातील ३० टक्के भागाचा असा करा वापर...
जर तुम्ही महिन्याला कोणताही ईएमआय भरत असाल तर त्यासाठी आधीपासून एक रक्कम ठरवा. ईएमआय भरल्यानंतर जे पैसे शिल्लक राहतील, ते मनोरंजन, पर्यटन आणि दुसऱ्या आवश्यक गोष्टींसाठी ठेवा. यामुळे तुमचं बजट बिघडणार नाही आणि क्षुल्लक खर्च कमी होईल.
बचत महत्त्वाची का आहे?
बचत प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. मग तुमचा पगार कमी असो की जास्त. बचत केलेले पैसे आपत्कालिन परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे ठरतात. अशावेळी तुम्हाला कुणाकडून पैसे कर्जाऊ घेण्याची गरज लागत नाही. कोणत्या कारणाने जर तुमची नोकरी गेली किंवा अचानक मोठा खर्च झाला तर तुमची बचत कामी येते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world