
शेअर बाजारात (Stock Market Update) आज (गुरुवार 15 मे) अत्यंत वेगवान हालचाली बघायला मिळाल्या. सकाळी कामकाजाला सुरुवात होताच सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex Nifty Today) या दोन्हीमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. बुधवारी निफ्टी 24666 वर बंद झाला होता. गुरुवारी तो 24494 पर्यंत खाली गेला होता. सेन्सेक्समध्येही सकाळी घसरण झालेली पाहायला मिळाली होती.
बुधवारी सेन्सेक्स 81330 वर बंद झाला होता. गुरुवारी सकाळी सेन्सेक्सने 80762 अंकांपर्यंत गटांगळी खाल्ली होती. मात्र सकाळी 11 च्या आसपास हे चित्र वेगाने बदलत गेल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अभूतपूर्व तेजी बघायला मिळाली. कामकाज संपतेवेळी निफ्टी 395 अंक वधारून 25062 वर बंद झाला तर सेन्सेक्स 1200 अंक वधारून 82,530 अंकांवर बंद झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार केदार ओक यांना गुरुवारी बाजारात आलेली तेजी आणि गुंतवकदारांची भूमिका याबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, "बाजारात अचानक आलेली तेजी ही फसवी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी इथे नफा पदरात पडून घ्यावा. बऱ्याच वेळी बाजार वरती आला बघून आपण नफेखोरी करत नाही. त्यानंतर बाजार करेक्शन देतो आणि आलेली संधी निघून जाते. कमी कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीत लक्ष्यावर नजर न ठेवता छोट्या मुदतीत मिळणारा नफा हा मूळ गुंतवणुकीवर मिळालेला परतावा समजावा. बऱ्याच वेळी असा नफा पदरात पाडून न घेता अपेक्षा ठेऊन गुंतवणूकदार थांबतो आणि मग SHORT TERM BECOME LONG TERM होऊन जाते.अनपेक्षित आलेली तेजी ही नैमित्तिक असून अश्यावेळी भावनेत न गुंतता परताव्याला प्राधान्य द्यावं."
( नक्की वाचा : Mumbai News : घराचं कर्ज फेडलं, मात्र फायनान्स कंपनीकडून नकार; मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं? )
खालच्या पातळीवरून निर्देशांकांची उसळी
सकाळची तूट भरून काढत सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा बाळसं धरलं होतं. आज दिवसभरातील नीचांकी बिंदूपासून सेन्सेक्सने 1956 अंकांची कमाई केली तर निफ्टीने 622 अंकांची कमाई केली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी ही आजच्या तेजीचं मुख्य कारण ठरलं आहे. लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरमध्येही चांगली तेजी बघायला मिळेल असे हेलिओस कॅपिटलचे सीईओ दिनशॉ इराणी यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना सांगितले. निफ्टीने गुरुवारी 25000 चा टप्पा ओलांडल्याचं पाहायला मिळालं तर सेन्सेक्सने 82500 चा टप्पा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. निफ्टीने ऑक्टोबर 2024 नंतर पहिल्यांदाच 25000 अंकांचा आकडा गाठला आहे. गेल्या 17 सत्रांमध्ये निफ्टीत 1000 अंकांची भर पडली आहे. निफ्टी ऑटोमध्ये आज जबरदस्त खरेदी बघायला मिळाली.
सोनं-चांदी स्वस्त
एक लाखांच्या पार गेलेले सोन्याचे दर आता खाली यायला लागले आहेत. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याचे दर बरेच कमी झाले. बुधवारच्या तुलनेत सोन्याचे दर प्रति तोळे 2 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. लग्नसराईपूर्वी सोनं स्वस्त झाल्याने अनेकांना दिलासा मिळतो आहे. सोन्याप्रमाणेच चांदी देखील स्वस्त झाली आहे. बुधवारच्या तुलनेत एक किलो चांदीचा दर गुरुवारी 2600 रुपयांनी कमी झाला. चांदीचा दर बुधवारी संध्याकाळी 97400 रुपये प्रति किलो होता. जो गुरुवारी सकाळी 94,800 रुपये झाला आहे.
भारत आणि पाकिस्तानातील तणावामुळे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स तेजीत आल्याचे दिसून येत आहे. डिफेंस सेक्टरची मार्केट कॅप 86 हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स 22 एप्रिलपासून आतापर्यंत 9 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
( नक्की वाचा : Gold Rates: सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; चेक करा आजचे दर )
जी स्क्वेअर या चेन्नईस्थित बांधकाम व्यवसाय कंपनीने सैन्य दलातील आजी-माजी जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी विशेष ऑफरची घोषणा केली आहे. सैन्य दलातील जवानांना दक्षिण भारतातील या कंपनीच्या प्लॉट विक्रीत 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी कमजोर झाला. यामुळे एका डॉलरची किंमत गुरुवारी सकाळी 85.64 रुपये इतकी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर काहीसा कमजोर असून कच्चा तेलाच्या किंमतीही घसरताना दिसत आहे. यामुळे रुपयाच्या घसरणीला वेसण बसली.
आयुष वेलनेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरचा भाव गेल्या 3 महिन्यात 80 टक्क्यांनी तर गेल्या वर्षभरात 500 टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवारी सकाळी या शेअरचा भाव 108 रुपयांच्या आसपास होता. या कंपनीने स्मार्ट हेल्थ किऑस्क आणि वैद्यकीय मदत केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 25 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने येस बँकेतील हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मूडीज रेटींगने ही एक सकारात्मक बाब असल्याचे म्हटले आहे. येस बँकेला दीर्घ काळासाठी एक चांगला भागीदार मिळेल आणि बँकेची बँलेंस शीट मजबूत होण्यासही मदत मिळेल असे मूडीजचे म्हणणे आहे. एसबीआय आणि फेडरल बँकेने येस बँकेतील आपला हिस्सा SMBC ला विकण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. अमेझॉनने डिव्हाईस आणि सर्व्हिस विभागातील 100 हून अधिक नोकऱ्या रद्द केल्या आहेत. या पदांवरील कर्मचारी अलेक्सा व्हॉईस असिस्टंट, किंडल ई-रिडर यासारख्या उत्पादनांसाठी काम करतात. येत्या काळात अमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी करेल अशी भीती वर्तवण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world