
बिहारमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजाने एका 15 वर्षीय मुलीचा जीव घेतला. डीजेचा मोठा आवाज ऐकून मुलगी बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तिथे मृत घोषित केले. मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर देखील उपचारात निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंकी कुमारी असं मृत मुलीचे नाव होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिला हृदयविकाराचा त्रास होता. दिल्लीतील पंत रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर पिंकी पूर्णपणे बरी देखील झाली होती. पिंकीचे वडील प्रमोद रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पिंकीवर सुमारे पाच वर्षे उपचार झाले.
बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास लग्नानंतरच्या पूजेच्या कार्यक्रमानिमित्त डीजे सुरु होता. डीजेचा रथ घेऊन ही मिरवणूक काढली जात होती. पिंकी तिच्या कुटुंबासह मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर आली होती. या दरम्यान डीजेचा मोठा आवाज ऐकून पिंकी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला दुचाकीवरून सदर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
मुलीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध करण्यास सुरुवात केली. काही वेळातच स्थानिक लोकही मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. संतप्त लोकांनी आरोपी डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अध्यक्ष राजन नंदन सिंह देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटतील आणि संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांवर कारवाईसाठी अर्ज करतील. त्यानंतर पोलिसांनी लोकांना समजावून शांत केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world