बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका तरुणीच्या अंत्यसंस्कारापूर्वी तिचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुटुंबीय हैराण झालं आहे. बिहारमधील भजनगामा गावात राहणारी तरुणी अनिसा कुमारी तब्बल ८ दिवसांपासून बेपत्ता होती. अनीसा २१ जून रोजी औषध घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती परतलीच नाही. यानंतर कुटुंबीयांनी जमिनीच्या वादातून तिचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी २३ जून रोजी तक्रार दाखल केली. यानंतर बेगूसरायातील एका तलावाच्या किनारी एका तरुणीचा मृतदेह पोत्यात आढळला. कुटुंबीयांनी पोलिसांच्या उपस्थितीत तिची ओळख अनिसा म्हणून पटवली.
जिवंत असल्याचं स्वत:चं सांगितलं, फोटोही पाठवला...
सोमवारी २९ जूनच्या सकाळी मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. मात्र तेव्हाच या प्रकरणात नवं वळण लागलं. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये अनीसाने स्वत:ला जिवंत असल्याचं सांगितलं. तिने स्वत:चा फोटो आणि एक व्हिडिओ शेयर केला. ज्यामध्ये ती सुरक्षित असल्याचा दावा करीत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावात विविध चर्चा सुरू झाल्या.
शेवटी तरुणीने सांगितलं नेमकं काय घडलं?
तरुणीने जिवंत असल्याचा दावा केला आणि म्हटलं, मी लव्ह मॅरेज केलं आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आहे. तरुणीची सद्यस्थिती आणि आधी मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासंबंधित पुराव्यांचा तपास केला जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, तरुणीला शोधणं हे पोलिसांची प्राथमिकता आहे. कोर्टात तिचं म्हणणं दाखल करून घेण्यात येईल. ज्यानंतर संपूर्ण प्रकरणाची वास्तविक स्थिती स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world