"तुरुंगाच्या भिंती मला कमजोर करु शकल्या नाहीत"; केजरीवाल भर पावसात बरसले

Arvind Kejriwal Release From Tihar: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भर पावसात तिहार तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं.

Advertisement
Read Time: 2 mins

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जवळपास 156 दिवसांनंतर शुक्रवारी तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भर पावसात तिहार तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं.

तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवाल भाजपवर निशाणा साधत म्हटलं की, "मी देशविरोधी शक्तींविरोधात लढत राहणार आहे. या लोकांनी मला तुरुंगात पाठवले. मात्र तुरुंगाच्या भिंती मला कमकुवत करू शकल्या नाहीत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझी ताकद 100 पटीने वाढली आहे."

(नक्की वाचा -  'पोर्ट ब्लेयर'चं नाव बदललं, सावरकर आणि नेताजींचा उल्लेख करत सरकारनं केली घोषणा)

मी देवाला प्रार्थना करतो की, जशी देवाने मला आजपर्यंत शक्ती दिली आहे, तसाच देवाने मला मार्ग दाखवावा. मी देशसेवा करत राहो. अशा अनेक देशविरोधी शक्ती आहेत, ज्या फूट पाडण्याचे काम करत आहेत. ते देशाला कमकुवत करतात, मी आयुष्यभर त्यांच्याविरुद्ध लढत राहीन. 

कोणत्या अटींवर जामीन मंजूर?

  • अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. 
  • कोणत्याही सरकारी फाइलवर सही करता येणार नाही.
  • दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित कोणतेही सार्वजनिक विधान ते करणार नाहीत.
  • त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा बाँड भरावा लागेल.
  • तपासात अडथळा येईल किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाहीत.
  • तपासात सहकार्य करावे लागेल आणि गरज पडल्यास ट्रायल कोर्टात हजर रहावे लागेल.

( नक्की वाचा : शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण? )

अरविंद केजरीवाल यांना कधी झाली होती अटक?

केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना 1 एप्रिल रोजी तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 2 जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करावे लागले होते. त्यानंतर 12 जुलै रोजी त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला. मात्र त्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली.

Topics mentioned in this article