
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे एआय 171 विमान गुरुवार, 12 जून रोजी अहमदाबादमध्ये क्रॅश झाले. (Ahmedabad Plane Crash). अपघाताच्या वेळी विमानात 242 लोक होते. 230 प्रवासी, 10 केबिन क्रू आणि दोन वैमानिक असे या विमनात होते. बोइंग कंपनीने बनवलेले हे 787-8 ड्रीमलाइनर मॉडेलचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात बीजे मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या निवासी क्वार्टरवर ते कोसळले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता क्रॅशच्या वेळचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात स्पष्ट दिसत आहे की विमान कोसळताच एका मोठ्या आगीच्या गोळ्यात ते बदलले. प्रश्न असा आहे की, विमान कोसळताच ते आगीच्या गोळ्यात का बदलले? याचे उत्तर तज्ज्ञांनी काय दिले आहे ते पाहूयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विमान आगीचा गोळा का बनले?
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. म्हणजेच त्याला लांबचा पल्ला गाठायचा होता. त्यासाठी त्याला आपल्या पूर्ण क्षमतेने इंधन भरून उड्डाण करायचे होते. हे विमान बोइंगचे 787-8 ड्रीमलाइनर मॉडेलचे होते. यात दोन-क्लास लेआउटसह एकूण 248 प्रवाशांच्या बसण्याची जागा असते. बोइंगच्या साइटनुसार, एका वेळी याच्या उड्डाणाची रेंज 13,620 किमी असते. यात GEnx-1B / Trent 1000 इंजिन बसवलेले असते. ग्लोबल एअर डॉट कॉम आणि आय 6 ग्रुपच्या अहवालानुसार, या मॉडेलची इंधन क्षमता सुमारे 1,26,000 ते 1,27,000 लिटर असते. या विमानात उड्डाण करताना 1,25,000 लिटर जेट इंधन होते.
आता या अपघाताच्या वेळेकडे लक्ष द्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोइंग ड्रीमलाइनर विमानाने दुपारी सुमारे 1.47 वाजता उड्डाण केले. उड्डाणाची परवानगी मिळाल्यानंतर 9 मिनिटांनी ते दुर्घटनाग्रस्त झाले. खरेतर या विमानाला अहमदाबादहून लंडनला पोहोचायला 5 तास लागतात. पण ते 9 मिनिटांनंतरच क्रॅश झाले. म्हणजेच, त्यात पूर्ण जेट इंधन जसेच्या तसे शिल्लक होते. त्यामुळे ज्या वेळी विमान कोसळले त्यावेळी त्याचा स्फोट झाला आणि इंधनामुळे प्रचंड आगा निर्माण झाली.
डीजीसीएने क्रॅशची चौकशी केली सुरू
नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) गुरुवारी सांगितले की, त्यांनी अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी सुरू केली आहे. डीजीसीएच्या प्रवक्त्याने सांगितले, "या क्षणी अपघाताचे निश्चित कारण कळाले नाही. सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे." त्यांनी पुढे सांगितले की, या चौकशीत सर्व संबंधित एजन्सीज सहभागी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे बोइंग 787 ड्रीमलाइनर विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे 23 वरून 13.39 वाजता उड्डाण केले. यानंतर थोड्याच वेळात 'मेडे कॉल' जारी करण्यात आला होता. परंतु कॉकपिटमधून कोणताही पुढील संपर्क प्राप्त झाला नाही. विमानाचे संचालन कॅप्टन सुमित सभरवाल करत होते, जे एअर इंडियाचे दीर्घकाळचे वैमानिक आहेत आणि त्यांना 8,200 पेक्षा जास्त उड्डाण तासांचा अनुभव होता. तर, फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी 1,100 तास उड्डाण केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world