जाहिरात
This Article is From May 31, 2024

एअर इंडियाचं विमान 20 तास लेट, तब्बल 8 तास प्रवासी AC शिवाय विमानात बंदिस्त 

दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

एअर इंडियाचं विमान 20 तास लेट, तब्बल 8 तास प्रवासी AC शिवाय विमानात बंदिस्त 
नवी दिल्ली:

दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून सॅन फ्रान्सिकोला जाणारं विमान 30 मे रोजी दुपारी 3.20 मिनिटांनी उड्डाण घेणार होतं, मात्र आता हे विमान 31 मेच्या सकाळी 11 वाजता उड्डाण घेईल. यादरम्यान प्रवाशांना हाल सहन करावे लागले. तब्बल आठ तास प्रवाशांना एसीशिवाय फ्लाइटमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आलं आणि उकाड्यामुळे काही जणं बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना विमानातून खाली उतरविण्यात आलं. अद्याप एअर इंडियाने फ्लाइट उशिर होण्याचं कारण सांगितलेलं नाही. 

गुरुवारी पत्रकार श्वेता पुंज यांनी ट्विटरवर पोस्ट करीत लिहिलं की, एआय 183 विमानाला आठ तास उशीर झाला होता. विमानात बसवल्यानंतर प्रवाशांना एसीशिवाय ठेवण्यात आलं. काही प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून खाली उतरविण्यात आलं. 

नक्की वाचा - प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना टॅग करीत पुंज यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, खाजगीकरणामुळे कोणती गोष्ट सर्वात अयशस्वी झाली असेल तर ती एअर इंडिया आहे. DGCA एआय 183 च्या विमानाला आठ तासांहून अधिक उशीर झाला आहे. प्रवाशांना एसीशिवाय अनेक तास विमानात बसवण्यात आलं. त्यानंतर काही प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर सर्वांना विमानातून खाली उतरविण्यात आलं. हे अमानवीय आहे. 

दुसरा एक प्रवासी अभिषेक शर्मा याने तातडीने कारवाईची मागणी केली आहे.  त्यांनी ट्विट केलेल्या फोटोंमध्ये लहान मुलांसह वृद्ध जमिनीवर बसल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: