
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं 242 प्रवाशांना इंग्लंडला घेऊन जाणारं विमान कोसळल्याची अत्यंत दु:खद घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह मेडिकल हॉस्टेलमधील मिळून 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते.
दरम्यान 242 प्रवाशांपैकी केवळ एकच प्रवासी रमेश विश्वास कुमार या दुर्घटनेतून बचावला आहे. हा मोठा चमत्कारच मानला जात आहे. विमानाची दुर्घटना अत्यंत भीषण होती. 300 ते 350 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारं विमान अचानक खाली कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील प्रवासी जळून खाक झाले. अनेकांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. अशा भीषण दुर्घटनेत रमेश विश्वास कुमार बचावला. विशेष म्हणजे तो स्वत: चालत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचला होता. या घटनेवर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे.
नक्की वाचा - Air India Plane Crash : ब्लॅक बॉक्स काय असतो? विमान दुर्घटनेचं रहस्य कसं उलगडतं? जाणून घ्या यामागील तंत्रज्ञान
दरम्यान तो कसा बचावला याविषयी अनेक चर्चा केल्या जात आहेत. काहींच्या मते विमान कोसळण्यापूर्वी त्याने सेफ्टी डोअर उघडून उडी मारली. अखेर त्याने स्वत: याबाबत मोठा खुलासा केला आहे.
विश्वास कुमार कसा बचावला?
विश्वासने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, विमानाने उड्डाण घेतल्याच्या मिनिट भरातच काहीतरी चुकीचं घडल्याचं जाणवत होतं. विमानात पांढऱ्या, हिरव्या रंगाच्या लाइट लागल्या होत्या. विमान आकाशात असताना वर जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचं जाणवलं. मात्र ते शक्य झालं नाही आणि विमान थेट खाली कोसळलं. यादरम्यान मी शुद्धीत होतो. माझ्या जवळच सेफ्टी डोअर होता. विमान खाली कोसळल्यानंतर ते उद्ध्वस्त झालं. सेफ्टी डोअर जवळ बाहेर पडण्याची जागा दिसली. मी सीटबेल्ट काढून तातडीने त्यातून बाहेर पडलो. माझ्या आजूबाजूला प्रवासी जळताना दिसत होते. मी कसा बसा त्यातून बाहेर पडलो. आणि मदतीसाठी धाव घेतली.
कोण आहे विश्वास कुमार?
विश्वाश कुमार रमेश 40 वर्षीय ब्रिटिश नागरिक आहे. तो आपल्या कुटुंबाला भेटायला भारतात आले होते. तो आपला भाऊ अजय कुमार रमेश (45) याच्यासह इंग्लंडला परतत होते. विश्वाश 11A सीटवर बसला होता. तर त्याचा भाऊ दुसऱ्या रो मध्ये बसला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world